ग्रामीण मुलींसाठी केंद्र सरकारतर्फे अत्यल्प दरात सॅनिटरी नॅपकिन

केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने नुकतीच ग्रामीण भागातील मुलींना अत्यल्प दरात सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्याच्या योजनेला मंजुरी दिली आहे. मुलींमध्ये मासिक पाळी दरम्यान शारीरिक स्वच्छतेसंबंधी घ्यावयाच्या उपाया संबंधी जागरुकता निर्माण करण्याचा या योजनेचा उद्देश आहे. १० ते १९ वयोगटातील अंदाजे दीड कोटी मुलींना या योजनेचा फायदा होणार आहे. दारिद्र्य रेषेखालील मुलींना केवळ एका रुपयात सहा नॅपकिनचे पॅक उपलब्ध करुन दिले जाईल, तर दारिद्र्य रेषेवरील मुलींना यासाठी पाच रुपये द्यावे लागतील.

भारतामध्ये मासिक पाळी संबंधी लोकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. त्यातच सामाजिक रुढींमुळे मुलींवर विविध बंधने येतात. सुरक्षित स्वच्छता साधनांचा अभाव हे मासिक पाळी दरम्यान शाळांमध्ये मुलींची उपस्थिती कमी होण्याचे व बरेचदा पाळी सुरु झाल्यावर गळण्याचे एक कारण आहे. यासोबतच संसर्गामुळे मुलींना विविध आजारांना तोंड द्यावे लागते.

या योजनेच्या पहिल्या ट्प्प्यामध्ये देशभरातील एकूण १५० जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये दक्षिणेतील चार राज्ये, महाराष्ट्र व गुजरात यांमधील ३० जिल्हे व उत्तरेतील तसेच मध्य व पुर्वांचल भागातील राज्यांच्या १२० जिल्ह्यांचा समावेश केला आहे. या नॅपकिनचे वाटप मासिक तत्त्वावर मानांकनप्राप्त सामाजिक आरोग्य कार्यकर्ते (आशा) यांच्याद्वारे किंवा थेट शाळेमध्ये केले जाईल. राज्यांना वितरण व निर्मितीमध्ये महिला बचत गटांनाही यात सहभागी करून घेता येईल.या नॅपकिनच्या निर्मितीमध्ये पर्यावरणास पुरक कच्च्या मालाचा वापर करण्यावर भर देण्यात येणार आहे. तसेच वापरलेल्या नॅपकिनची सुरक्षित वासलात लावण्यासाठी सुद्धा गावपातळीवर उपाय योजना करण्यात येणार आहे. पहिल्या ट्प्प्याच्या अंमलबजावणीचे निष्कर्ष हाती आल्यावर अन्य जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविण्यात येईल.

संदर्भ: दैनिक हिंदू

0 प्रतिक्रिया:

Post a Comment