शुभारंभ

सस्नेह नमस्कार,
सर्वप्रथम मी या ब्लॉग संदर्भात केलेल्या प्रकाशनपुर्व आवाहनाला आपण उदंड प्रतिसाद दिलात त्याबद्दल आपले मन:पुर्वक आभार. खरंतर मागील वर्षभरापासूनच सामाजिक कार्याशी संबंधित ब्लॉग सुरु करावा असे मनात ठरले होते. महाराष्ट्रातील काही सामाजिक संस्थांना भेटल्यावर असे लक्षात आले की अनेक लहान व मध्यम स्तरातील संस्था केवळ योग्य माहितीच्या व तशाच प्रकारचे काम करणार्‍या अन्य संस्थांशी समन्वयाअभावी उपलब्ध संशोधन व संसाधनापासून वंचित राहिल्या आहेत. म्हणूनच स्वयंसेवी संस्था व संबंधित व्यक्तिंमध्ये आपआपसांत विविध विषयांवर आदान प्रदान व्हावे, सेवाक्षेत्रातील ताज्या घडामोडींची माहिती करुन देणे आणि अनोख्या समाजोपयोगी प्रयोगांची व तंत्रज्ञानाची ओळख करुन देणे हे सेवायोग सुरु करण्यामागचे मुख्य उद्देश ठेवले आहेत.


याआधीच स्पष्ट केल्या प्रमाणे जरी या ब्लॉगचा मुख्य भर हा महाराष्ट्रातील स्वयंसेवी क्षेत्रावर असला, तरी भारतातील तसेच विविध देशांमधील स्वयंसेवी संस्था व सामाजिक उद्यमशीलतेशी संबंधित घडामोडींचीही माहिती सेवायोगवर उपलब्ध करुन दिली जाणार आहे.

स्वयंसेवी क्षेत्राशी संबंधित सर्व कार्यकर्त्यांना मी पुन्हा एकदा या ब्लॉगच्या माध्यमातून आवाहन करतो की तुम्ही करीत असलेल्या अनोख्या प्रयोगांची, सामाजिक उपक्रमांची आणि तुमच्या संस्थेच्या कार्यक्रमांची आगाऊ माहिती मला कळवा. याबरोबरच तुमच्या संस्थेमधील नोकरीच्या, स्वयंसेवेच्या व अभ्यासाच्या संधींबद्दलही जरुर कळवा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या ब्लॉगच्या माध्यमातुन आपण आपले विचार व विविध लेखानावरील मतं मांडावीत ही आंपणांस आग्रहाची विनंती.

आपण सेवायोगवर प्रासंगिक किंवा नियमित लेखन करण्यास उत्सुक असल्यास आपले येथे स्वागत आहे. आपल्या ज्ञानाचा व संशोधनाचा अनेक संस्थांना व त्यांच्या उपक्रमांना उपयोग व्हावा ही अपेक्षा.

आपल्या सूचना व प्रतिसादांच्या प्रतिक्षेत,
जयेश

संपर्कासाठी इमेल पत्ता: sevaconnect [@] gmail [dot] com
(स्पॅम मेल पासून बचाव करण्यासाठी इमेल वेगळ्या प्रकारे लिहिला आहे. आपण मात्र तो नेहमीच्या पद्धतीनेच लिहावा. सुज्ञांस अधिक सांगणे न लगे.)
वि.सू.: इमेल द्वारे नवे लेखन नियमित प्राप्त करण्यासाठी उजवीकडील संबंधित चौकटीत आपला इमेल पत्ता लिहून नोंदणी करावी.

0 प्रतिक्रिया:

Post a Comment