सामाजिक उद्यमशीलता

सामाजिक कार्य म्हणजे लष्कराच्या भाकर्‍या भाजणे असा समज पूर्वी लोकांमध्ये असे. मागील काही वर्षांमध्ये समाजात व अर्थव्यवस्थेमध्ये झालेल्या बदलांचे प्रतिबिंब सामाजिक कार्याच्या रचनेत व पद्धतीत झाल्याचे दिसून येते. अलिकडे सामाजिक कार्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टीकोन बदलला आहे. गल्लीतील अथवा नगरातील मंडळाच्या जागी सुनियोजित व व्यावसायिक (प्रोफेशनल) पद्धतीने चालणार्‍या एनजीओ आल्या. एम.एस.ड्ब्ल्यू. चे कोर्सेस महाविद्यालयांमधून शिकवले जाऊ लागले. सामाजिक कार्य हे एक करिअर म्हणून पाहिले जाऊ लागले. पूर्वी नाममात्र मानधनावर काम करणारे पगारी कार्यकर्ते आता काही लाखांमध्ये पगार घेऊ लागलेत. उद्योगक्षेत्रामध्ये 'कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटी' नावाचा प्रकार आला. सामाजिक कार्यांना होणारा पैशांचा ओघ वाढू लागला. अशातच अलिकडच्या काळात 'Social entrepreneurship' म्हणजेच 'सामाजिक उद्यमशीलता' या संकल्पनेचा जन्म झाला.

अलिकडच्या काळापर्यंत असा समज होता की सामाजिक कार्यामध्ये व्यावसायिक कौशल्यांची आवश्यकता नसते. परंतु बदलत्या काळानुसार विपणन, व्यवस्थापन, संशोधन व लेखा परिक्षणाचे आधुनिक तंत्र यामुळे सामाजिक संस्थानां त्यांचे ध्येय साध्य करण्यास नक्कीच मदत होते हे सिद्ध झाले आहे.

सामाजिक उद्यमशीलता म्हणजे काय?
उद्योजकीय संकल्पनांचा व मूल्यांचा वापर करून सामाजिक कार्य अथवा प्रकल्प चालविण्याच्या पद्धतीस आपण सामाजिक उद्यमशीलता असे थोडक्यात म्हणू शकतो. अशा प्रकारे एखादे सामाजिक कार्य किंवा प्रकल्प चालविणार्‍या व्यक्तिस आपण सामाजिक उद्योजक असे म्हणायला हरकत नाही. नावीन्यता, सृजनशीलता, जोखीम पत्करण्याची क्षमता व धैर्य हे कोणत्याही सामाजिक उद्योजकाचे मूलभूत गूण आहेत. बरेचदा असे उद्योजक शासकीय मदतीच्या भरवश्यावर न राहता अन्य माध्यमांद्वारे आपल्या कार्यासाठी निधी मिळवितात. ते केवळ सामाजिक प्रश्न (Social problem) उठविण्याचे काम करीत नाहीत, तर अशा प्रश्नांवर परिणामकारक व नावीन्यपुर्ण उपाय शोधून त्याची व्यावसायिक पद्धतीने अंमलबजावणी करतात. व्यापारी उद्योगामध्ये (Business Entreprise) अर्जित आर्थिक लाभावरुन यशाचे मोजमाप केले जाते, तर सामाजिक उद्यमामध्ये (Social Entreprise) त्या संस्थेची यशस्वीता तिने विशिष्ट सामाजिक प्रश्नाबाबत केलेल्या कार्याच्या परिणामावरुन मोजली जाते.

उद्योग समूहांचा बदलता दृष्टीकोन
पूर्वी सामाजिक संस्थांना देणग्या देताना मिळणारी कर सवलत हा उद्योग समूहांच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा असे. आपण देणगी म्हणून दिलेल्या रकमेचा कसा विनियोग होत आहे हे जाणून घेण्यास उद्योग समूह फारसे उत्सुक नसायचे. तसेच अशा देणग्यांमागे काही छुपे उद्देशसुद्धा असायचे. परिणामी संबंधित कार्य त्याच्या प्राथमिक उद्दिष्टापासून भरकटले जाण्याची शक्यता अधिक असे. आता कर सवलतींच्या पुढे जाऊन उद्योग समूह आपण दिलेल्या देणग्यांमुळे खरोखरच किती सकारात्मक परिणाम साधला गेला याबद्दल अधिक जागरुक झाले आहेत.
सामाजिक साहसवित्त निधी (Social Venture Fund) सारख्या प्रयोगांमुळे सामाजिक उद्योजकांना त्यांच्या धाडसी संकल्पना अंमलात आणण्यासाठी आर्थिक पाठबळ मिळत आहे. यामध्ये देण्यार्‍याला व घेणार्‍यालाही आर्थिक जवाबदारीचे भान असते, ज्यामुळे उपक्रम अयशस्वी होण्याची शक्यता कमी होते. सामाजिक उद्यमांमुळे दिलेल्या निधीचा योग्य कारणांसाठीच उपयोग होत आहे याची जास्तीत जास्त हमी असते. भारतामध्ये अविष्कार सोशल मायक्रो व्हेंचर फंड तसेच भारतीय युवा शक्ति ट्रस्ट या संस्थांनी असा व्हेंचर फंड स्थापन केला आहे.

फॉर प्रॉफिट सामाजिक उद्यम
सामाजिक कार्य म्हणजे कोणत्याही लाभाच्या उद्देशाशिवाय केलेले कार्य असा मोठा समज आजवर प्रचलित होता. अनेकांना सामाजिक कार्यात सहभागी होण्याची इच्छा असते, परंतु व्यावसायिक अडचणींमुळे आवश्यक तो वेळ देता येत नाही. सामाजिक उद्यमांच्या माध्यमातून आर्थिक उत्पन्नासह पुर्णवेळ सामाजिक कार्य करण्याची इच्छाही साध्य होते. असे असले तरी, अशा उद्यमांचा मुख्य हेतु हा आर्थिक उत्पन्न मिळविणे नसून सामाजिक परिवर्तन करणे हाच असतो. इंग्लंड मध्ये तर सामाजिक उद्यमांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने 'कम्युनिटी इंटरेस्ट कंपनी' हा नवीन कायदेशीर पर्याय (legal form) निर्माण केला आहे. भारतामध्ये मात्र अजून तरी असा पर्याय उपलब्ध नाही, त्यामुळे फॉर प्रॉफिट सामाजिक उद्यमांना प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचाच मार्ग स्वीकारवा लागत आहे. अश्विन नाईक या अमेरिकेतील सुस्थापित युवकाने भारतात परतून कर्नाटकातील ग्रामीण भागामध्ये माफक दरात आरोग्यसेवा पुरविण्यासाठी 'वात्सल्य हेल्थकेअर' ही कंपनी सुरू केली आहे. विक्रम अकुलांची 'एस.के.एस. मायक्रो फायनान्स कंपनी' हा सुद्धा एक फॉर प्रॉफिट सामाजिक उद्यम आहे. नोबेल पारितोषिक विजेते डॉ. यूनूस मोहम्मद यांची ग्रामीण बँक हे सामाजिक उद्यमाचे सर्वात प्रसिद्ध उदाहरण आहे.

फॉर प्रॉफिट असो वा नॉट फॉर प्रॉफिट, एकमात्र खरे की सामाजिक उद्यमांमुळे सामाजिक प्रश्न नावीन्यपुर्णतेने व गतीने सोडविण्याचा नवा पर्याय निर्माण झाला आहे.

(उपक्रम संकेतस्थळावर पुर्वप्रकाशित)

0 प्रतिक्रिया:

Post a Comment