तुम्ही आरएसएस फीड रिडर वापरता का?

सेवायोगला भेट दिल्यावर अनेकजणांनी माझ्याकडे या ब्लॉगवर असलेल्या 'फीडरिडर द्वारे वाचा' हा काय प्रकार आहे याची चौकशी केली. प्रत्येकाला फीडरिडर कसा वापरावा याचं प्रात्यक्षिक देणं शक्य नाही, त्यामुळे या विषयावर शक्य तेवढ्या सोप्या भाषेत पोस्ट लिहिण्याचा विचार केला. सर्वप्रथम सेवायोग पासूनच सुरुवात करु. आता जर तुम्हाला हा ब्लॉग न चुकता वाचायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला इथे नियमित यावे लागेल. तुमच्या नेहमीच्या वाचनात असे अनेक ब्लॉग असतील. त्यातले सर्वच ब्लॉग काही नियमित अद्यावत केले जात नाहीत. त्यामुळे वरचेवर तिथे जाऊन नवीन काही लिहिले गेले आहे का हे बघावे लागते. आणि त्यात जर तुम्ही अनेक ब्लॉगचे वाचक असाल तर वेगवेगळ्या ब्लॉगना नियमित भेट देणे ही कष्टप्रद बाब ठरते. अशावेळी फ़ीड अ‍ॅग्रिगेटर (किंवा फ़ीड रिडर) हे अ‍ॅप्लिकेशन खुपच उपयोगी ठरते. फीड रिडरमुळे तुम्ही तुमच्या वाचनातील सर्व ब्लॉगवरील नवे लेखन एकाच ठिकाणी वाचू शकता.


शेजारील छायाचित्र हे आरएसएस म्हणजेच रियली सिम्पल सिंडीकेशन फ़ीडचे वैश्विक बोधचिन्ह आहे. आजकाल जवळपास सर्वच ब्लॉगकर्ते आरएसएस फ़ीडची सुविधा आपल्या ब्लॉगवर उपलब्ध करुन देतात. आता आरएसएस फीड कसे काम करते या फंदात न पडता त्याचा कसा वापर करावा याबद्दल मी सांगणार आहे. त्यासाठी तुम्हाला एक फीड अ‍ॅग्रिगेटर शोधायचा आहे.

हे अ‍ॅग्रिगेटर ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन प्रकारचे असतात. ऑनलाईन प्रकारात एखाद्या सेवा प्रदात्याच्या संकेतस्थळावर जाऊन लॉगिन करुन त्यांचे वेब बेस्ड फीड अ‍ॅग्रिगेटर वापरता येते. ऑफलाईन अ‍ॅग्रिगेटर तुमच्या संगणकावर स्थापित करावा लागतो. यात तुम्ही सर्व फीड डाऊनलोड झाल्यावर इंटरनेट जोडणी बंद करुन तुमच्या वेळेनुसार कधीही ब्लॉग पोस्ट वाचू शकता. थोडं सोपं करुन सांगायच झाल्यास अगदी आऊट्लूक एक्सप्रेस सारखाच हा प्रकार आहे.

एकदा का तुम्ही तुमच्या पसंतीचा अ‍ॅग्रिगेटर निवडलात की तुम्ही नियमित भेटी देणार्‍या ब्लॉग वा संकेतस्थळांवर जाऊन तेथे आरएसएस फीडच्या बोधचिन्हावर टिचकी मारा. तुमच्या पसंतीचा अ‍ॅग्रिगेटर निवडून सबस्क्राईब करा. आता तुम्हाला नवीन पोस्ट आली कि नाही हे पाहण्यासाठी संबंधित ब्लॉग वा संकेतस्थळावर वारंवार जाण्याची आवश्यकता नाही. तुम्ही सबस्क्राईब केलेल्या सर्व ब्लॉगवरील नवीन पोस्ट तुमच्या अ‍ॅग्रिगेटरमध्ये एकत्र पाहता/वाचता येतील.


तुम्ही गुगल खातेधारक (म्हणजेच गुगलच्या जीमेल किंवा अन्य सेवांचे वापरकर्ते) असाल तर गुगल रिडर हा ऑनलाईन प्रकारातील एक चांगला अ‍ॅग्रिगेटर आहे. बाय द वे, तुम्ही जर अ‍ॅग्रिगेटरलाच नियमित भेट द्यायचे विसरत असाल तर अगदी तुमच्या इमेल खात्यातही या फीड येण्याची व्यवस्था असते.

0 प्रतिक्रिया:

Post a Comment