डीलाईट डिझाईनला अ‍ॅश्डेन सुवर्ण पुरस्कार

अ‍ॅश्डेन या लंडन स्थित आंतरराष्ट्रीय संस्थेतर्फे शाश्वत उर्जेच्या क्षेत्रात योगदान दिल्याबद्दल डीलाईट डिझाईन, इंडिया या सामाजिक उद्यमाला वर्ष २०१० चा चाळीस हजार ब्रिटिश पौंड ( सुमारे २८ लाख ४० हजार रुपये) इतक्या रकमेचा अ‍ॅश्डेन सुवर्ण पुरस्कार घोषित करण्यात आला.

दारिद्र्याचे उच्चाटन व वातावरणीय बदलाच्या समस्येवर समाधान म्हणून स्थानीय शाश्वत उर्जेच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी सन २००१ मध्ये अ‍ॅश्डेन अवार्ड फॉर सस्टेनेबल एनर्जीची स्थापना करण्यात आली. आतापर्यंत इंग्लंड व अन्य देशांमधील १४० च्या वर व्यक्ति / संस्थांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

डीलाईट डिझाईन हा एक सामाजिक उद्यम असून त्यांच्यामार्फत सौर उर्जेवर आधारित दिव्यांचे उत्पादन केले जाते. जगात प्रत्येक वर्षी सुमारे १६ लाख स्त्रिया व मुले घरातील प्रदुषणामुळे मृत्युमुखी पडतात. या प्रदुषणाचे मुख्य कारण हे रॉकेलवर जळणारे दिवे आहेत. डीलाईटने या समस्येवर उत्तर म्हणून स्वस्त व
विश्वासार्ह सौर दिव्यांची निर्मिती केली.जवळपास तीसपेक्षा जास्त देशांमध्ये ग्रामीण उद्योजकांमार्फत त्यांनी २ लाख २० हजार दिवे विकले आहेत. सन २०२० पर्यंत प्रदुषणमुक्त उर्जेच्या वापराद्वारे १० कोटी लोकांचे जीवनमान उंचावण्याचे डीलाईटचे लक्ष्य आहे. अ‍ॅक्युमेन फंड या सामाजिक उद्यमांना आर्थिक पाठबळ देणार्‍या आंतरराष्ट्रीय साहस वित्त निधी (Venture Capital Fund) संस्थेने डीलाईटमध्ये गुंतवणूक केली आहे.

डीलाईटच्या एका उत्पादनात दिव्यासोबतच मोबाईल फोनही चार्ज करण्याची सुविधा देण्यात आली आहे.  एलईडीच्या वापरामुळे या हे दिवे तुलनेने अधिक काळ प्रकाश देतात. कंपनीची उत्पादने विकसनशील व अविकसित देशांमधील ग्रामीण जनतेच्या गरजांनुसार संकल्पित (design) केली आहेत.

0 प्रतिक्रिया:

Post a Comment