अनुभवाचे बोल...

नमस्कार,
आकस्मिकपणे उदभवलेल्या एका तांत्रिक अडचणीमुळे मागील संपुर्ण आठवड्यात एकही नवी पोस्ट सेवायोगवर टाकता आली नाही याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. महत्त्वाच्या कामाचा नियमित बॅकअप घेणे ही किती महत्त्वाची गोष्ट आहे हे यानिमित्ताने माझ्या पुन्हा लक्षात आले. सुदैवाने फारशी हानी न होता प्रकरण थोडक्यात निभावले :)

असो, आपल्यापैकी अनेकजण संगणकावरील आपल्या कामाचा नियमित बॅकअप घेत असालच. नसल्यास आठवड्यातून किमान एकदा तरी संगणकावरील कामाचा बॅकअप नक्की घेत जा. डीव्हीडीवर राईट करणे हा बॅकअप घेण्यासाठी सोपा पर्याय आहे. परंतु आठवड्याभरात एक जीबीचाही डेटा जमा होत नसल्यास प्रत्येकवेळी डीव्हीडी राईट करणे सोयीचे नाही. याकरीता तुम्ही एक पेन ड्राईव्ह वापरू शकता. पेन ड्राईव्हवर अगदी रोजच्या रोज दिवसअखेर झालेल्या कामाचा बॅकअप घेऊन चार पाच जीबी झाल्यावर एकदाच डीव्हीडीवर राईट करुन ठेवू शकता.

संगणकावरील डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी अ‍ॅन्टीव्हायरस सॉफ्टवेअर वापरणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच ते वेळच्यावेळी अद्ययावत करणेही महत्त्वाचे आहे. अवास्ट (Avast) हे मोफत उपलब्ध असलेल्या अ‍ॅन्टीव्हायरस सॉफ्टवेअरमध्ये खूप उपयुक्त सॉफ्टवेअर आहे.

इंटरनेट वापरताना मोझिलाच्या फायरफॉक्स या ब्राऊझरचा वापर मायक्रोसोफ्टच्या इंटरनेट एक्सप्लोररपेक्षा अधिक सुरक्षित समजला जातो. तसा गुगलचा क्रोम हा ब्राऊझरही वापरण्यास सोपा व तुलनेने सुरक्षित आहे. जे अजूनही इंटरनेट एक्सप्लोरर वापरत असतील त्यांनी फायरफॉक्स किंवा क्रोम वापरून पहायला हरकत नाही.

संगणकीय सुरक्षा हा थोडक्यात न संपणारा विषय आहे. म्हणूनच आता इथे थांबतो. तुमचेही अनुभव व अडचणी कळवा. उद्यापासून आपले नेहमीचे विषय सुरु होतीलच.

धन्यवाद,
जयेश

जाता जाता: काही जणांनी मला विचारले आहे की तुम्ही पोस्टमध्ये इथून डाऊनलोड करा असे लिहिता पण दुवा (लिंक) देतच नाही. नवीन इंटरनेट वापरणार्‍यांचा थोडा गोंधळ उडणे स्वाभाविक आहे :-) पोस्टमध्ये बरेचवेळा काही शब्द निळ्या रंगात असतात. या शब्दांनाच दुवे जोडलेले असतात. त्या शब्दांवर कर्सर नेऊन टिचकी मारल्यास संबंधित संकेतस्थळ उघडेल.

0 प्रतिक्रिया:

Post a Comment