पिरामल पुरस्कारासाठी अर्ज पाठवा

पिरामल फाउंडेशन व आयआयएम अहमदाबादच्या उद्योजकता व नवोन्मेषता विकास केंद्राच्या संयुक्त विद्यमाने भारतातील आरोग्य समस्येवर प्रभावी उपाय योजणार्‍या अभिनव संकल्पनांना पाठबळ देण्यासाठी पिरामल पुरस्कार देण्यात येतो. आरोग्य सेवा पुरविण्यातील अभिनवता, तांत्रिक उपयोजन, आरोग्य विषयक उत्पादने, किंवा सार्वजनिक आरोग्य गरजा पुरविण्याकरिता एखादी यंत्रणा जसे पिण्यास योग्य पाणी, इत्यादी व अशाच प्रकारच्या विषयांत काम करणार्‍या संस्थेस पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार दोन विभागांमध्ये देण्यात येतो.


१.उभरते उद्योग
तीन वर्षांच्या आतील एखादा उद्योग जो संकल्पना, सुरुवात किंवा वाढीच्या टप्प्यात असेल परंतु त्याने प्रायोगिक नमुना विकसित केलेला किंवा पथदर्शी प्रकल्प पुर्ण केलेला किंवा चालु स्थितीत असावा. विजेत्यांस रुपये १० लाखाच्या पुरस्कारासोबतच कार्यालयासाठी जागा, कार्य सहाय्य व विस्तारासाठी मार्गदर्शनही मिळेल.

२.प्रस्थापित संस्था
रोगांचा भार कमी करण्यातील क्षमता सिद्ध असलेल्या संस्था या विभागात अर्ज करु शकतील. अर्जदार विना-नफा संस्था किंवा नफा कमाविणारे उद्योगही असू शकतात. परंतु आरोग्यसेवेत मोठ्या स्तरावर मापनक्षम प्रभाव साध्य केलेला असावा. या विभागातील विजेत्यांसही रुपये १० लाखांचा पुरस्कार मिळेल.

सामाजिक संस्था ज्यांच्या उत्पन्नाचा किमान काही प्रमाणात स्वत:चा स्त्रोत असेल अशा संस्था अर्ज करण्यास पात्र असतील. संपुर्णत: देणग्यांवर अवलंबून असणार्‍या संस्थाना यात प्राधान्य नसेल. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १५ ऑगस्ट २०१० आहे. अधिक माहितीसाठी या संकेतस्थळास भेट द्या.

पिरामल फाऊंडेशन हा पिरामल हेल्थकेअर या भारतातील नामवंत औषध निर्माण कंपनीचा सामाजिक उपक्रम आहे.

0 प्रतिक्रिया:

Post a Comment