कठीण समस्या, सोपा उपाय

बर्‍याचदा अनेक मोठ्या समस्यांचे उत्तर लहान गोष्टींमध्ये दडलेले असते. आवश्यकता असते ती समस्येकडे वेगळ्या नजरेतून पहाण्याची. विकसनशील देशांत व विशेषत: आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये पाणी ही एक मोठी समस्या आहे. कोणत्याही समाजात पाणी भरण्याचे काम बरेचदा महिला व लहान मुलांवरच पडते. अनेक आफ्रिकन गावांमध्ये पाणी आणण्यासाठी सरासरी आठ किलोमीटरची पायपीट करावी लागते. यातून महिला व मुलांना मानेचे व पाठदुखीचे विकार जडतात.

हॅन्स हेन्ड्रीक्स या दक्षिण आफ्रिकेतील वास्तुरचनाकाराने जेंव्हा पाण्यासाठी वणवण फिरणारी बायका पोरे पाहिली तेंव्हा त्याने आपला भाऊ पीटर हेन्ड्रिक्स सोबत या समस्येवर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला, आणि या प्रयत्नांतून जन्माला आला क्यु ड्रम. पाण्याची वाहतुक करण्याचा एक साधा सोपा व स्वस्त उपाय.

क्यु ड्रम हा लिनीअर लो डेन्सिटि पॉलिथिलीन (LLDPE) पासून बनविला असल्यामुळे याची सहजासहजी तुटण्याची शक्यता फार कमी असते.
साधारणत: मेदू वड्याच्या आकारासारखा हा ड्र्म त्याला अडकविलेल्या रशीच्या सहाय्याने अगदी बारा चौदा वर्षांची पोरे सुद्धा सहज ओढून नेऊ शकतात. पुर्ण भरलेला ड्रम ५० लिटर पाणी वाहून नेऊ शकतो.

असाच दुसरा एक शोध आहे प्ले पम्प. लहान मुलांच्या मेरी गो राऊंड या या जत्रेतील खेळण्यावर आधारलेला. मुलांच्या खेळण्यातून निर्माण होणार्‍या उर्जेचा वापर करुन जमिनीतून पाणी वर खेचायचे ही यामागील कल्पना आहे. मुले जशी हे चक्र फिरवितात तसे जमिनीखाली जोडलेल्या नलिकेतून पाणी वर खेचले जाते. हे पाणी जवळच बांधलेल्या सात मीटर उंची वरील २५०० लीटर क्षमतेच्या टाकीमध्ये चढविले जाते. तेथुने ते नळाद्वारे वितरीत केले जाते. मुलांचा खेळही होतो आणि पाणी भरण्याचे कामही होते.

1 प्रतिक्रिया:

Anonymous said...

नमस्कार तुमचा हा लेख व ब्लॉग देखील आवडला. तुमचा उपक्रम स्तुत्य आहे. आमच्या परीने काही करता आले तर नक्की करू.धन्यवाद.

Post a Comment