पालव बंधुंचा इको फ्रेंडली गणेश

नैसर्गिक साहित्याचा पुरेपूर वापर करत इकोफ्रेंडली अशी गणेशमूर्ती तयार करुन हलक्या आणि मजबूत मूर्तीचा एक आदर्श सिंधुदुर्गातील कणकवली तालुक्यातील कलाकार प्रमोद पालव यांनी सर्वांच्या समोर ठेवला आहे. या मूर्तींमुळे प्रदूषणाचा प्रश्न सुटला असल्याने प्रमोद पालव यांच्या संशोधनाचा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने गौरव केला असून अशा हलक्या आणि इकोफ्रेंडली गणेशमूर्ती बनवण्याचे पेटंट पालव यांना बहाल करण्यात आले आहे.

वडिलांकडून शिल्पकलेचा वारसा घेतलेल्या पालव बधूंनी या मूर्तीकलेत आणखी संशोधन करत झाडाचा रस, कागद, डिंक आणि शाडू मातीच्या मिश्रणातून अनोखे रसायन निर्माण करुन हलक्या आणि मजबूत गणेशमूर्तीची निर्मिती केली आहे. जे. जे. आर्टमधून पदवी घेतलेले प्रमोद पालव सध्या भालचंद्रनगरी कणकवलीत वास्तव्याला आहेत. नैसर्गिक साहित्याचा मूर्ती कलेत कसा वापर केला जाईल आणि जास्तीत जास्त इकोफ्रेंडली मूर्ती कशी बनेल याकडेच त्यांचा कल असतो.


कागदाचा लगदा तयार करुन त्यात शाडू माती आणि उंबर, बाभळ या झाडांचा रस काढून या मिश्रणातून गणेशमूर्ती आकाराला येते. या मूर्ती कडक आणि हलक्याही असतात. विर्सजनासाठी या मूर्ती पाण्यात सोडल्या की, काही मिनिटातच त्या विरघळू लागतात. कागदाच्या लगद्यामुळे विर्सजनानंतर तात्काळ पाण्याचा तळ गाठतात. प्लॅस्टरच्या मूर्तीपेक्षा ५० टक्के हलक्या असणार्‍या या मूर्तीच्या रंगकामात काही ठराविक रंग वगळता अन्य रंग झाडपाला, माती आणि दगडापासून बनवितात. पालव यांच्या मूर्तीशाळेत गेल्यावर याचे दर्शन घडते. एका बाजूला भेंडय़ांच्या बोळातून रस काढला जात होता तर दुसरीकडे कुपीत्रीसारख्या दगडातून अभ्रकाचा किस काढला जात होता. हा किस वस्त्रगाळ करुन मूर्तीसाठी चमकी तयार करण्यात येते अशी माहिती पालव यांनी दिली. नदीतील लव्हाळ्यांचा काडय़ांचा वापर ते रंग कामासाठी करतात.

सध्या पालव यांच्या मूर्तीशाळेत इकोफ्रेंडली गणेशमूर्तीचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. राज्य सरकारकडून १ लाख गणेशमूर्तींची ऑर्डर मिळाल्याचे पालव यांनी अभिमानाने सांगितले. अशा इकोफ्रेंडली गणेश मूर्ती सर्वत्र बनविल्या जाव्यात यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रमोद पालव यांच्या कार्यशाळा राज्यभर आयोजित केल्या आहेत.

सौजन्य: महान्यूज

0 प्रतिक्रिया:

Post a Comment