चिंधी ते सॅनिटरी नॅपकिन !

ग्रामीण भागातील मुलींना अत्यल्प दरात सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्याच्या योजनेबद्दलची पोस्ट सेवायोगवर याआधी आपण वाचली असेलच. श्री. प्रभाकर नानावटी यांचा याच विषयावरील विस्तृत लेख त्यांनी सेवायोगच्या वाचकांसाठी उपलब्ध करुन दिला आहे. नेहमीच्या ब्लॉग पोस्टच्या मानाने हा लेख किंचित मोठा असला तरी नक्किच वाचनीय व उदबोधक आहे.
------------------------------------------------------------------------------
नुकतीच सरकारने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत ग्रामीण भागात राहाणार्‍या १५० जिल्ह्यातील १० ते १९ वयोगटातील, दारिद्र्य रेषेखालील, मुलींसाठी स्वस्तात सॅनिटरी नॅपकिन पुरवण्याची एक महत्वाकांक्षी योजना आखली आहे. काही तुरळक सधन स्त्रिया वगळता खेड्यापाड्यातील बहुतेक मुली व स्त्रिया मासिक पाळीच्या दरम्यान अडगळीत ठेवलेल्या कुठल्या तरी अस्वच्छ कापडाची चिंधी वापरून वेळ निभावत असतात. अनेकदा एकच कापड दोघी - तिघीत वापरले जाते. राजस्थानातील काही खेड्यातल्या महिलांना वाळूच्या पिशव्यांची चिंधी या कामी उपयोगी पडते. व्यक्तिगत आरोग्य रक्षणाबद्दलच्या माहितीचा अभाव, प्राथमिक स्वरूपातल्या लैंगिक शिक्षणाबद्दलचे अज्ञान, अशा "विषया" बद्दल चारचौघीत बोलण्याची लाज व कुचंबणा, घरातील अष्टदारिद्र्य व हेळसांडपणामुळे बहुतेक स्त्रिया अनेक प्रकारच्या स्त्रीरोगांना बळी पडतात.

टीव्हीवरील जाहिरातीत गोड गोड चेहर्‍याच्या त्या कोवळ्या मुली (व त्यांच्या लहान बहिणीसारख्या दिसणार्‍या त्यांच्या सुंदर आया!) जेव्हा एखाद्या विशिष्ट ब्रँडच्या सॅनिटरी नॅपकिनचे (नको तेवढे!) गुण वर्णन करत असतात
तेव्हा आपल्यासारख्या प्रेक्षकांच्या मनात असले महागडे नॅपकिन गरीब मुलींना परवडत असतील का असा विचार नक्कीच येत असेल. या तथाकथित ब्रँडेड नॅपकिन्सची किंमत ६ ते १० रुपये प्रती नॅपकिन असते (व एका पाळीच्या वेळचा खर्च १०० ते १२५ एवढा असू शकतो.) त्यामुळेच ग्रामीण भागातील (व शहरी भागातील कनिष्ट मध्यम व गरीब) मुलींना व पालकांना ते परवडत नाहीत. म्हणूनच या मुली कुठली तरी चिंधी वापरून वेळ मारून नेतात. परंतु अशा प्रकारे आरोग्याकडे दुर्लक्ष करत राहिल्यामुळे पुढील आयुष्यातील गर्भधारणा, गर्भारपण व प्रसूतीच्या वेळी अनेक शारीरिक समस्यांना सामना करावा लागेल याची त्यावेळी त्यांना कल्पना येत नाही.

ग्रामीण भागात स्वस्तात सॅनिटरी नॅपकिन पुरवण्याच्या या योजनेची कार्यवाही करण्यासाठी गेली दोन वर्षे शासन प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून या नॅपकिनच्या उत्पादनाची जवाबदारी महिला बचत गटांना का देऊ नये ही कल्पना पुढे आली. शासनाच्या समोर तमिळनाडू येथील एका बचतगटाचे उदाहरण होते. तमिळनाडू येथील पुडुकोट्टाई या खेड्यातील Welfare Organisation for multipurpose Mass Awareness Network (WOMAN) ही संस्था गेली दहा वर्षे या नॅपकिनच्या उत्पादनात असून दर महिन्याला सुमारे ६ लाख नॅपकिन्स तयार करते. एका नॅपकिनच्या विक्रीची किंमत दोन रुपये असल्यामुळे आज त्या खेड्याच्या अवती भोवती राहाणार्‍या सुमारे दीड लाख ग्रामीण स्त्रिया जुन्या कापडाऐवजी सॅनिटरी नॅपकिन वापरत आहेत. ही संस्था सुरुवातीस कापड व कापूस यांचा वापर करून नॅपकिन बनवत असे. परंतु आता मात्र कोइमत्तूर येथील एका कल्पक उद्योजकाने शोधलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करत आहे.

मुरुगनाथम या उद्योजकाने नॅपकिन्सच्या उत्पादनासाठी दोन-तीन मशिन्सचे एक युनिट तयार केले आहे. नॅपकिन बनविण्यासाठी कच्चा माल म्हणून पाइन झाडाच्या लाकडांचा लगदा, कापूस, पॉलिथिलिन फिल्म, व रिलीज कागद वापरले जातात. लगदा पाळीच्या वेळी स्रवणार्‍या द्रवांचे शोषण करतो. पॉलिथिलिन फिल्म लगद्याच्या बेससाठी, कापूस वेष्टनासाठी व रिलीज कागद नॅपकिनला धरून ठेवण्यासाठी वापरला जातो. एका मशीनवर लगद्यापासून बारीक सूत काढले जाते. दुसर्‍या एका मशीनवर त्यांचे हव्या त्या आकारात चौकोनी ब्लॉक्स बनवतात. या ब्लॉक्संना तिन्ही बाजूने कापसाने आच्छादित केल्यानंतर त्यांना निर्जंतुकीकरणासाठी (स्टेरिलाइज व डिसइन्फेक्ट) अल्ट्रा व्हायोलेट किरणांच्या एका मशीनमधून सोडले जाते. ही यंत्रणा रोज १००० नॅपकिन तयार करू शकते. मुरुगनाथम यांना अशा प्रकारे बनवलेले नॅपकिन्स काम करू शकतात व वापरण्यास सुरक्षित आहेत हे ठसवणे महाकठिण काम झाले होते. स्वत:च्या आईला व बहिणीलासुद्धा त्यांनी बनविलेल्या नॅपकिनच्या गुणवत्तेबद्दल शंका होती. मेडिकल विद्यार्थ्यांपुढे यांची चाचणी देताना त्यानी चक्क फुटबॉलच्या आतल्या ब्लॅडरमध्ये शेळीचे रक्त साठवून त्याखाली नॅपकिन ठेवून दाखविले.

पुडुकोट्टाई येथील संस्थेकडे अशा प्रकारचे सहा युनिट्स आहेत. प्रत्येक उत्पादन युनिटसाठी १०-१२ महिला काम करतात. या रोजगारामुळे त्यांचे जीवनमान सुधारत आहे. प्रत्येक महिला सुमारे पाच हजार रुपये दर महिना कमवू शकते. नॅपकिनच्या पॅकवर वापरानंतर "या नॅपकिन्स तुम्ही जाळू शकता. त्यामुळे प्रदूषण होत नाही" अशी सूचना लिहिलेली असते. इतर ब्रँडेड कंपन्या लगद्याच्यावर कापसाऐवजी सिंथेटिक फायबर वापरत असल्यामुळे त्यांचे नॅपकिन्स बायोडिग्रेडेबल नसतात.

महिला बचत गटांना बहुतेक सर्व राज्यात उत्तेजन मिळत आहे. कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गुजरात, तमिळनाडू, उत्तर प्रदेश या राज्यात ही चळवळ वाढत आहे. भ्रष्ट राजकारण्यांचा यात शिरकाव न झाल्यास व होऊ न दिल्यास बचत गटांकडून जास्त आपण मोठ्या अपेक्षा ठेऊ शकतो. उत्तर प्रदेश येथील अनुप शहरमधील परदादा परदादी शिक्षण संस्था स्वस्त नॅपकिनचे उत्पादन करत असून विद्यार्थिनींना ५ रुपयाला १० नॅपकिन याप्रमाणे विक्री करत आहे.

ग्रामीण आरोग्य योजनेच्या अधिकार्‍यांच्या मते सुमारे पन्नास जिल्ह्यात बचत गटांची मदत घेऊन नॅपकिन्सचा पुरवठा करता येईल व इतर शंभर जिल्ह्यांसाठी, बचत गटांकडे मूलभूत सुविधा व अनुभव नसल्यामुळे, खाजगी उत्पादकांकडे जावे लागणार आहे. नॅपकिन्सची खरेदी कुणाकडून करावी हा त्या त्या राज्याच्या अखत्यारीचा विषय आहे. गडचिरोली येथील सर्च या संस्थेचे डॉ. अभय बंग यांच्या मते या प्रकारच्या योजनेत खाजगी उत्पादकांचा सहभाग असल्यास भ्रष्टाचाराला आमंत्रण दिल्यासारखेच ठरेल. त्यांच्याबरोबरच बहुराष्ट्रीय कंपन्या मैदानात उतरतील. ग्रामीण महिलांना चकचकित वेष्टनांची व जाहिरातींच्या भुलभलैय्याची सवय लावल्यानंतर काही दिवसातच भाववाढ करण्यास ते मोकळे! म्हणूनच डॉ. बंग बचतगटांकडे उत्पादन हवे यासाठी आग्रही आहेत.

मुरुगनाथमच्या मते अमेरिकेतून पाइन झाडाचा लगदा व कॅनडाहून उच्च प्रतीचा कापूस मोठ्या प्रमाणात आयात करूनसुद्धा नॅपकिनचे विक्रीमूल्य प्रती नग दॊन रूपयाच्या आत ठेवणे शक्य आहे. हेच नॅपकिन आपले खासगी उत्पादक व बहुराष्ट्रीय कंपन्या ६ ते ११ रुपये प्रती नॅपकिन किंमत ठेऊन प्रचंड प्रमाणात नफा कमावतात. ही महागडे नॅपकिन्स बायोडिग्रेडेबल नसल्यामुळे प्रदूषणात भर पडत राहते. उत्पादनाचे विकेंद्रीकरण, ने-आणीसाठीचा कमी खर्च, स्वस्तात विक्री व प्रदूषणविरहित उत्पादन यामुळे कदाचित बचतगटांकडे जवाबदारी दिल्यास ग्रामीण भागातील जास्तीत जास्त गरीब स्त्रियापर्यंत सॅनिटरी नॅपकिन्स पोचू शकतील. कर्नाटक व तमिळनाडू येथील बचतगट कमी किंमतीची, योग्य गुणवत्तेची व वेळेवर पुरवठा करण्याची हमी देण्यास तयार असून खाजगी व बहुराष्ट्रीय कंपन्याबरोबरीने बोली लावण्याइतपत त्यांच्यात आत्मविश्वास आहे!

संदर्भ: डाउन टू अर्थ (जुलै १६-३१, २०१०)

0 प्रतिक्रिया:

Post a Comment