टाकावू वस्तूंपासून बनविलेल्या खेळण्यांच्या जगात...

लेखक: श्री. प्रभाकर नानावटी

अरविंद गुप्ता
आताच्या शहरी धकाधकीत दोन-अडीच वर्षापासून रतीब घातल्यासारखे शिक्षण देण्याच्या नादात लहान मुलांचे बालपण केव्हा हरवून जाते हेच कळेनासे झाले आहे. त्याबद्दल कुणालाही ना खंत, ना खेद! परंतु अशाही परिस्थितीत काही सुज्ञ, लहान मुलांमधील निरागसपणा, कल्पनारम्यता, सर्जनशीलता टिकविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करताना दिसतात. कुठेतरी शेवटच्या पानावर त्यांच्याबद्दलची एखादी छोटीशी बातमी असते. लहानांचं जग टिकवण्यासाठी हे ’वेडे’ प्रयत्नशील असतात. पुण्यातील आयुकाच्या परिसरामधील मुक्तांगण विज्ञान शोधिकेत गेली २०-२५ वर्षे कार्यरत असलेले व दिवस-रात्र लहानांच्या ध्यासात गुंतलेले अरविंद गुप्ता हे अशाच काही मोजक्या सुज्ञ ’वेड्यां’ पैकी एक आहेत.

आधुनिक जीवनशैलीचे अपरिहार्य अंग म्हणून वापरून टाकावू बनलेल्या वस्तूंकडे आपल्याला असहायपणे बघावे लागत आहे. पर्यावरण रक्षणातील मूलभूत चार ’R' पैकी refuse करू शकत नाही, reuse जमत नाही, recycle ची सुविधा नाही, व repair शक्य नाही, अशी अवस्था असल्यामुळे टाकावू वस्तू साठत जातात. परंतु या आयआयटी प्रशिक्षित अभियंत्याने काही प्रमाणात अशा टाकावू वस्तूंचा वापर करत लहान मुलांमुलींसाठी कल्पनारम्य खेळण्यांचा खजिनाच उभा केला आहे. प्लॅस्टिक बाटल्या, रद्दीपेपर, स्ट्रॉ, शाई संपलेले रिफिल्स, मोडके तुटके पेन्स, जुनी मासिकं, पिव्हिसी पाइप्स, इंजेक्शन सिरिंज, सायकल ट्यूब्स, चाकाचे स्पोक्स, बाटलीची झाकणं, पेपर क्लिप्स, टाकावू सीडी, आरशाचे तुकडे, जुनी आमंत्रण पत्रिका, सुतळी, दोरा .... काहीही असू दे, अरविंद गुप्तांच्या दृष्टीने ती खेळणी बनवण्यासाठी उपयोगी ठरू शकतात. विद्यार्थ्यांसाठी वेगळे काही करावे या विचाराने शाळांचे काही शिक्षक स्वत:हून विद्यार्थ्यांना गुप्तांच्या आयुका मधील शोधिकेत दिवसभरासाठी आणून सोडतात. इथे ही मुलं सर्वस्वी वेगळ्या अशा अद्भुत जगात दिवसभर वावरतात. खेळतात, बागडतात, खेळणी हाताळतात, जमल्यास खेळणी बनवतात. परंतु अशा प्रकारे फारच कमी विद्यार्थ्यांपर्यंत पोचता येते. तसेच या खेळण्यांवर त्यानी लिहिलेली पुस्तकं उपलब्ध असली तरी प्रात्यक्षिकांचा दृष्य भाग दाखवण्यास ती असमर्थ ठरतात.

म्हणुनच इंटरनेटवरील यूट्यूब संकेतस्थळाच्या सहाय्याने त्यांनी आपले क्षितिज विस्तारले आहे गुप्ता यांचे इंटरनेटवरील संकेतस्थळ उघडल्यास इंग्रजी, हिंदी, मराठी सहित विविध भाषांमधून टाकाऊ वस्तूंपासून खेळणी बनविण्याचे व्हीडीओ पहायला मिळतात. बहुतांश व्हीडीओ १ ते ३ मिनिटांचे असून प्रत्येकांस इंग्रजीत सबटायटल्स आहेत. या सर्व गोष्टी यूजर्स फ्रेंड्ली असल्यामुळे खेळणी बनवणे सोपे होत आहे. यातील सूचनेप्रमाणे रद्दीपेपरची घडी घालत गेल्यास त्यापासून १५-२० प्रकारची खेळणी बनवता येतात. बलूनमध्ये हवा भरून त्यास इतर काही वस्तू जोडून त्याचे रॉकेट बनवता येते. ताटलीतील पाणी, व आरश्याच्या एका तुकड्याच्या सहाय्याने त्यांनी इंद्रधनु्ष्यातील रंग दाखवणारा प्रयोग केला आहे. या खजिन्यात विज्ञानाचे धडे शिकविणारी अनेक खेळणी आहेत. eddy करंट म्हणजे नेमके काय असते convection करंट म्हणजे काय, fuzzy लॉजिक नेमके काय हे सांगू शकणारी प्रात्यक्षिके आहेत.

अरविंद गुप्ता व त्यांच्या सहकार्यांनी हे सर्व चित्रण अगदी सोप्या व सहजपणे उपलब्ध असलेल्या संगणकीय गोष्टी वापरून केल्या आहेत. इंटरनेटची सुविधा नसलेल्यांसाठी या व्हीडीओंची डीव्हीडी तयार केली आहे. कित्येक पालकांना आपली मुलं खेळण्यात रममाण व्हावी असे मनापासून वाटत असले तरी लेगो सारखी खेळणी अत्यंत महाग म्हणून विकत घेता येत नाहीत व भारतीय किंवा चायनीज बनावटीची खेळणी दुकानाबाहेर पडल्या पडल्या निकामी होतात म्हणून घ्यावीशी वाटत नाहीत. त्यामुळे गुप्तांच्या खेळण्यांच्या दुनियेत प्रवेश करून एखादे दुसरे खेळणे बनविण्याचा प्रयत्न करण्यास हरकत नसावी.

शोभा भागवत यांनी अरविंद गुप्तावर लिहिलेल्या पुस्तकात उल्लेख केल्याप्रमाणे "अनेक जण म्हणतात तसा हा खरंच ’वेडा’ म्हणून आहे आणि असे वेडे आहेत म्हणूनच जग सुंदर आहे ! "

उपक्रम संकेतस्थळावर पुर्वप्रकाशित

0 प्रतिक्रिया:

Post a Comment