स्वयंसेवी संस्थांना ’जिल्हा योग व स्वास्थ केंद्र’ चालविण्याची संधी

मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थान ही भारत सरकारच्या आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयाच्या आयुष या विभागांतर्गत एक स्वनियंत्रित संस्था आहे. योग शिक्षण, संशोधन व त्याचा प्रसार करण्याची जबाबदारी या संस्थेवर आहे. या संस्थेने सार्वजनिक व खाजगी भागीदारीतून जिल्हा योग व स्वास्थ केंद्राची योजना आखली आहे, ज्या अंतर्गत ११ व्या पंचवार्षिक योजनेमध्ये टप्प्याटप्प्याने देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात किमान एका स्वयंसेवी संस्थेची निवड करुन तिला या कामासाठी आर्थिक व तांत्रिक मदत दिली जाईल.

उद्दिष्ट्ये:
  • योगाच्या आरोग्य विषयक फायद्यांबद्दल समाजात जागरुकता निर्माण करणे.
  • लोकांच्या अध्यात्मिक, शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी योगाचे शास्त्रीय प्रशिक्षण देणे.
  • योगाच्या प्रसारासाठी प्रशिक्षण केंद्रांची साखळी तयार करणे.
  • संस्थेच्या शालेय आरोग्य कार्यक्रमाचे संयोजन करणे.

स्वयंसेवी संस्थांसाठी पात्रता निकष:
  • सोसायटी नोंदणी कायदा १८६० अंतर्गत संस्था किंवा न्यास म्हणून नोंदणी
  • मागील ३ वर्षे योग प्रशिक्षण / आरोग्य प्रसारात कार्यरत असणे आवश्यक.
  • योग प्रशिक्षणासाठी संस्थेकडे किमान सुविधा उपलब्ध असणे तसेच आरोग्य विषयक जागरुकता निर्माण करण्यासाठी निपुणता आवश्यक आहे.
योजने अंतर्गत निवडलेल्या संस्थांना केंद्र चालविण्यासाठी दरमहा रुपये ३२५०० इतके अनुदान देण्यात येईल. तसेच सुरुवातीस एकदा रुपये ६०,००० इतकी रक्कम सुविधा उभारण्यासाठी देण्यात येईल. या योजनेसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर २०१० आहे. अधिक माहितीसाठी संस्थेच्या संकेतस्थळावरुन माहितीपत्रक उतरवून घ्या.

0 प्रतिक्रिया:

Post a Comment