गावगुंफण: सक्षम स्त्रिया = सर्वांगीण प्रगती

गर्भधारणा आणि प्रसूती हा स्त्रियांच्या आयुष्यातला कसोटीचा काळ असतो. पुरुषप्रधान व्यवस्थेत आधीच दुर्लक्षित, कुपोषित राहिलेल्या बायका आणि त्यात खेड्यांमध्ये असलेला प्राथमिक आरोग्य सेवांचा अभाव या गोष्टी तर स्त्रियांचा कर्दनकाळच ठरतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी काय करता येईल याचा एक उत्कृष्ट वस्तुपाठ मराठवाड्यातील 'हॅलो मेडिकल फाउंडेशनने आपल्या कार्यातून घालून दिला आहे. खेड्यात आरोग्यसेवा उभारण्यासाठी शहरी डॉक्टर आणि नर्सेस वगैरेंवर अवलंबून राहण्याऐवजी गावातल्या बाईच्या मदतीला जर तिच्याच गावातली बाई येऊ शकली तर ते सर्वात परिणामकारक होईल हे लक्षात घेऊन औरंगाबाद वैद्यकीय महाविद्यालयातल्या काही आदर्शवादी तरुणांनी ऐंशीच्या दशकात उस्मानाबाद जिल्ह्यातल्या काही खेड्यांत कामाला सुरुवात करुन हॅलो मेडिकल फाउंडेशनचे बीज रोवले.

म्हटलं तर त्यांची कल्पना अतिशय साधी होती. आधुनिक वैद्यकामुळे अनेक आजार सहज आणि फारसा खर्च न करता टाळता येतात किंवा बरे करता येतात. पण खाण्यापिण्याकडे केलेलं दुर्लक्ष आणि साध्या-सोप्या उपायांची माहिती नसणं हीच खेड्यातली खरी अडचण असते. त्यात भोंदू वैद्य आणि रुग्णाकडून पैसे उकळायला टपलेले डॉक्टर हे खेड्यातल्या अज्ञानाचा गैरफायदा घेतात. त्यापेक्षा खेड्यातल्याच काही महिलांना प्राथमिक आरोग्य सेवेचे धडे द्यायचे आणि त्यांना आपल्याच गावात कार्यरत ठेवायचं अशी ती कल्पना होती. चीनमधल्या अनवाणी डॉक्टर या योजनेपासून कार्यकर्त्यांनी प्रेरणा घेतली.

अशा कामाला काय प्रकारच्या अडचणी येऊ शकतात याची आपण कल्पना करू शकतो. मुळात मुलींनी शिकूच नये; शिकल्या तरी एकदा लग्न लागलं की सासरी राहून जन्मभर नवरा, मुलं आणि सासरच्या मंडळींची सेवा करत जन्म काढावा अशा विचारांच्या जगात बायकांना अशा लष्करच्या भाकर्‍या भाजायला बाहेर काढायचं हीच एक कठीण गोष्ट होती.

संस्थेनं गावांतल्या बायकांना मूलभूत वैद्यकीय तपासण्या करण्याचं आणि प्राथमिक उपचार करण्याचं प्रशिक्षण दिलं. दाईचं प्रशिक्षण घ्यायला गावातल्या मागास, परित्यक्ता, दलित किंवा मुस्लिम स्त्रियांना प्राधान्य दिलं. अशा गरजू बायकाही कदाचित या कामासाठी जास्त सहजतेनं तयार झाल्या असतील. खेड्यापाड्यांत असणार्‍या जातीपातींच्या टोकदार वास्तवाचा विचार करता अशा कामासाठी एखाद्या बाईला जातपात न विचारात घेता कुणी आपल्या घरात घेतील ही गोष्टही कठीण वाटते. पण हे शक्य झालं, कारण गावातल्या बायकांना आपली आबाळ होते आहे हे कळत होतं आणि या बायका आपला तारणहार आहेत हेही कळत होतं. अशा पध्दतीनं या कामामुळे अनायासे जातिनिर्मूलनालाही हातभार लागला.

एकदा स्त्री सक्षम झाली की ती आपलं घरदार आणि परिसर सुधारते हा इतरत्र दिसून येणारा प्रकार इथेही दिसला. हळूहळू ग्रामसभेमध्ये स्त्रियांचा सहभाग वाढला. गावात शौचालयं बांधणं, पिण्याच्या पाण्याची सोय करणं, स्त्रीभ्रूणहत्यांविरोधात आंदोलन, दारूबंदी अमलात आणणं अशा गोष्टींसाठी सरकरकडून विविध योजनांद्वारे जी मदत मिळते त्याची माहिती बायकांना होऊ लागली; कंबर कसून त्यांनी अशा योजनांना गावाचा पाठिंबा मिळवला.

वयात येणार्‍या मुलींना स्वतःच्या शरीराविषयी माहिती देणं असे उपक्रमही चालू झाले; लग्न आणि शरीरसंबंधांविषयी त्यांना वाटणारी भीती घालवून त्यांना अधिक सक्षम केलं गेलं. गावातल्या जन्म-मृत्यूंची नोंदणी ते कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडणार्‍या स्त्रियांना मदत अशी अनेक इतर कामंही या महिलांकडून होऊ लागली.

किरकोळ औषधोपचार निव्वळ एका बसच्या तिकिटाएवढ्या खर्चात होऊ लागले पण गंभीर आजाराकरता खर्च करावाच लागे. मग त्यासाठी मदत म्हणून गावात महिला बचत गट सुरू केले गेले. त्यांद्वारे बायकांच्या हातात पैसा खेळायला लागला. सावकाराची कर्जं फेडणं, घरगुती व्यवसायासाठी भांडवल असाही त्या पैशाचा उपयोग होऊ लागला. घरच्या घरी शेवया-पापड बनवणं, दळण-कांडण करून देणं अशा व्यवसायांचं प्रशिक्षण आणि साधनसामुग्री महिलांना दिली जाऊ लागली. त्यातून महिलांना उत्पन्नासाठी नवीन मार्ग उपलब्ध झाले. हळूहळू गाव सुधारत गेलं.

आज संस्थेचं काम सत्तर गावांत आहे. शहरांतल्या गरीब वस्त्यांमध्येही आरोग्याच्या समस्या खेड्यांसारख्याच आहेत हे लक्षात घेऊन संस्थेनं आता सोलापुरातही काम सुरू केलं आहे. सोलापुरातल्या सत्तर झोपडपट्ट्यांमध्ये आज संस्था कार्यरत आहे. पुण्यातले रंगकर्मी अतुल पेठे यांनी संस्थेच्या कार्यावर ’गावगुंफण’ हा माहितीपट बनविला आहे. 'हॅलो मेडिकल फाउंडेशन' या संस्थेनं मराठवाड्यातल्या खेड्यांमध्ये उभ्या केलेल्या सामाजिक क्रांतीची यातून ओळख होते.

(सदर लेख उपक्रम संकेतस्थळांवर ’चिंतातुर जंतु’ या टोपण नावाने लेखन करणार्‍या लेखकाने लिहिला आहे.)

0 प्रतिक्रिया:

Post a Comment