सुक्ष्म वित्त कंपन्या संशयाच्या भोवर्‍यात

सध्या देशभरात व्यावसायिक सुक्ष्म वित्त कंपन्यांबद्दल संशयाचे वादळ निर्माण झाले आहे. याला कारणही तसेच आहे. गेल्या महिन्याभरात आंध्र प्रदेशात आत्महत्या करणार्‍यांची व तसा प्रयत्न करणार्‍या सुक्ष्म वित्त कर्जदारांची संख्या तब्बल ४२ वर पोहचली आहे. म्हणूनच खडबडुन जागे झालेल्या राज्य शासनाने सुक्ष वित्त संस्थांवर नियंत्रण आणण्यासाठी तातडीने अध्यादेश जारी केला आहे.

कर्ज वसुलीसाठी व्यापारी बॅंकांसारखी पद्धत या सुक्ष्म वित्त कंपन्यांनी अवलंबविण्यास सुरुवात केली. न्यू इंडीयन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार आत्महत्या करणार्‍यांमध्ये एसकेएस, शेअर मायक्रोफिन तसेच स्पंदन स्फुर्ती या आघाडीच्या कंपन्यांच्या कर्जदारांचा समावेश आहे.

टाईम मासिकाने गौरविलेल्या विक्रम अकुलांची एसकेएस मायक्रो फायनान्स कंपनी सध्या या वादाच्या केंद्रस्थानी आहे. अलिकडेच या कंपनीने समभाग (आयपीओ) विक्रिस काढले होते. रोखेबाजारात त्याला उदंड प्रतिसादही मिळाला. त्यानंतर मात्र एसकेएसच्या व्यवस्थापकीय संचालक गुरुमणी यांच्या हकालपट्टीने वादाला तोंड फुटले.

गोरगरिबांना सावकारी पाशातून मुक्ति देण्याचा प्रभावी मार्ग म्हणून सुक्ष्म वित्त (मायक्रो फायनान्स) प्रकाराकडे पाहिले जाते. ग्रामीण गरिबांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढून स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी बॅंकांच्या मदतीने बचत गटांचे मोठे जाळे विणले. केवळ सेवाभावी वृत्तीने सुक्ष्म वित्त पुरवठा करण्याच्या या क्षेत्रात हळूहळू व्यापारी संस्थांनी प्रवेश केला. रोखेबाजारात प्रवेश करुन आपली क्षमता वाढविण्याचा जरी एसकेएसचा तथाकथित उद्देश्य असला तरी रोखेबाजारात गुंतवणूक करणार्‍यांचा उद्देश्य मात्र केवळ नफा कमविणे हाच असतो. गुंतवणूकदारांच्या दबावाखाली एसकेएसला तिचा ’सेवाभाव’ जपता येईल का हा महत्त्वाचा प्रश्न आहे. नफा कमविण्यात काहीच पाप नाही, परंतु सेवेचा आव आणून नफेखोरी करणे नक्किच घातक आहे.

0 प्रतिक्रिया:

Post a Comment