सुक्ष्म वित्त कंपन्यांची दूसरी बाजू

सुक्ष्म वित्त (मायक्रो फायनान्स) कंपन्यांबद्दल सध्या जे काही वादळ चालू आहे त्याबद्दल सेवायोग वर याआधी लिहिले गेले आहे. परंतु स्वयंसेवी क्षेत्रात काम करणार्‍या कार्यकर्त्यांना याची दुसरी बाजू सुद्धा कळावी यासाठी ही आजची पोस्ट. नुकताच मी अनलिमिटेड इंडिया या संस्थेने सामाजिक उद्योजकांसाठी आयोजित केलेल्या एक तीन दिवसीय कार्यशाळेत सहभागी झालो होतो. ही कार्यशाळा हाच एका वेगळ्या पोस्टचा विषय आहे. त्याबद्दल नंतर सविस्तर लिहिनच परंतु आता आजच्या विषयाकडे वळू.
या कार्यशाळेत माझी मुकूट दिपक या युवा उद्योजकाबरोबर ओळख झाली. मुकूट हा आयआयएम कॅलकटाचा स्नातक असून त्याने बोस्टन कंसल्टींग ग्रुप व हिंदुस्थान युनिलिव्हर या आंतरराष्ट्रिय सल्लागार कंपन्यांसोबत काम केले आहे. सध्या तो डीटूओ ही स्वतःची कंपनी चालवितो. डीटूओ सामान्य लोकांसाठी परवडणार्‍या दरातील सुक्ष्म कर्ज, विमा इत्यादी वित्तीय उत्पादनांचे वितरण करते.

मुकूटच्या मते सुक्ष्म वित्त कंपन्यासंदर्भात सध्या जो गदारोळ चालू आहे तो जरा वाजवीपेक्षा जास्तच आहे. कारण पहिली गोष्ट म्हणजे ज्या एसकेएस मायक्रो फायनान्सवरुन हे वादळ उठले आहे ती कंपनी म्हणजे काही सुक्ष्म वित्त क्षेत्राची एकमेव प्रतिनिधि नाही आणि एसकेएस सारखे अंतर्गत वाद अन्य क्षेत्रातील कंपन्यांतही होत असतात.

सुक्ष्म वित्त संस्थांच्या चढ्या व्याज दरावर होणारी टीकाही अनाठायी आहे. यासाठी मुकूटने मोबाईल कंपन्यांचे उदाहरण दिले. सुरुवातीस मोबाईलचे दर प्रति मिनिटास १६ रुपयांपर्यंत होते परंतु आता मात्र ते अगदी गरिबातल्या गरिबांच्या आवाक्यात आहेत. सुक्ष्म वित्त क्षेत्र अजून परिपक्व होण्याची आवश्यकता आहे. एवढ्यातच त्यावर कडक निर्बंध लादल्यास या क्षेत्राची वाढ खुंटू शकते. आज ग्रामीण गरिबांपर्यंत थेट पोहचणे बॅंकांना जमलेले नाही ही वस्तुस्थिती आहे. कारण याचा खर्च त्यांना परवडणारा नाही. वाढीव व्याज दरातून सुक्ष्म वित्त संस्था आपला व्यवसाय करतात.

सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सुक्ष्म वित्त संस्थांमुळे अनेकांची सावकारी पाशातून सुटका झाली. या संस्था जास्त व्याजदर आकारत असल्या तरी त्या कायद्याने बांधील असतात. सरकारसोबतच माध्यमांची व स्वयंसेवी संस्थांचीही त्यांच्यावर नजर असते. मात्र खाजगी सावकारीवर कुणाचेच निर्बंध नसतात. मुकूट या क्षेत्राचे प्रतिनिधित्व करत असल्याने त्याची मतं जरी समर्थन करणारी असली तरी अगदीच दुर्लक्ष करण्यासारखी सुद्धा नाहीत. तुम्हाला काय वाटत?

0 प्रतिक्रिया:

Post a Comment