तपस्या - स्वयंसेवी संस्थांवरील अनोखी टीव्ही मालिका

चांगलं काम लोकांपर्यंत पोहचलं की त्याला भरभरुन मदत करणारी अनेक चांगली माणसं आपल्या आजूबाजूस असतात. निरपेक्षवृत्तीने वंचितांसाठी काम करणार्‍या स्वयंसेवी संस्थांचा समाजाला परिचय करून देणार्‍या तपस्या या टी.व्ही. मालिकेमूळे याचा पुन्हा प्रत्यय आला. श्री. एकनाथ सातपूरकरांच्या अरुषा क्रिएशन्स या संस्थेची निर्मिती असलेल्या तपस्या मालिकेचे दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर आतापर्यंत ३५ भाग प्रसारित झाले आहेत. सासू-सूनेचे मसालेदार कथानक किंवा कुणी सुप्रसिद्ध कलाकार नायक-नायिकेच्या रुपात नसतानाही महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून या मालिकेस लोकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.

शहरी भागात सह्याद्री वाहिनी किती लोक पाहतात हा एक संशोधनाचा मुद्दा आहे. त्यामूळे ज्यांना ही मालिका पाहता आली नाही अशा सर्वांसाठी पहिल्या २६ भागांच्या डीव्हीडीचे प्रकाशन करण्यात येणार आहे. येत्या ३ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता मुंबईतील यशवंत नाट्यगृहामध्ये अणुउर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते डीव्हीडीचे प्रकाशन होईल.

आपण ज्याला कलीयुग म्हणतो अशा काळातही आज अनेक व्यक्ति दिव्याप्रमाणे स्वत: जळून इतरांस प्रकाश देण्याचे कार्य करतात. यूट्यूब वरील या मालिकेसंदर्भातील खालील चित्रफीत पाहिल्यास अशा दिव्यांमध्ये तेल घालणारेही अनेक हात आजच्याच काळात आहेत याची साक्ष पटते.


ज्यांना कार्यक्रमास उपस्थित राहायचे असेल किंवा डिव्हीडी विकत घ्यावयाची असल्यास त्यांनी ०२२-२४३०५३९२ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा aurushacreations@gmail.com या इमेल पत्त्यावर संपर्क साधावा.

0 प्रतिक्रिया:

Post a Comment