सामाजिक कार्याची नवी वाट - भाग ३

सामाजिक उद्यमांत आधी म्हटल्याप्रमाणे तीन प्रकार असतात. त्यापैकी पहिला म्हणजे विनालाभ सामाजिक उद्यम. आता सर्वसाधारण स्वयंसेवी संस्था ज्या एनजीओ म्हणून ओळखल्या जातात त्या सुद्धा विनालाभ तत्वावरच काम करत असतात. मग या दोघांत असा कोणता फरक आहे जो सामाजिक उद्यमांचे वेगळेपण अधोरेखित करतो. हा फरक म्हणजे त्यांची काम करण्याची पद्धत होय. नफा कमाविण्याचे उद्दिष्ट सोडल्यास विनालाभ सामाजिक उद्यमही, कंपन्यांप्रमाणेच सुयोग्य नियोजन करुन व्यवसायिक पद्धतीने काम करतात. विनालाभ सामाजिक उद्यमांनाही देणग्यांच्या माध्यमातून पैसे मिळतात. परंतु सर्वसाधारण स्वयंसेवी संस्था जिथे लाभार्थींच्या कल्याणासाठी केलेल्या पैशांच्या विनियोगाकडे खर्च म्हणून पाहतात तर सामाजिक उद्यम याकडे गुंतवणूक म्हणून पाहतात. या गुंतवणूकीवरील परतावा मोजण्याचेही त्यांचे काही विशिष्ट मापदंड असतात. लाभार्थींना स्वयंपुर्ण बनविण्याकडे त्यांचा कल असतो.

कायदेशीर दृष्ट्या भारतात विनालाभ सामाजिक उद्यम व स्वयंसेवी संस्था यांच्यात फारसा फरक नाही. ट्रस्ट, सोसायटी व सेक्शन २५ अंतर्गत कंपनी असे तीनच पर्याय सध्यातरी नोंदणीसाठी उपलब्ध आहेत. सामाजिक उद्यम अशी कोणतीही कायदेशीर वर्गवारी अस्तित्वात नाही. तसेही जेंव्हा एखादी स्वयंसेवी संस्था परंपरागत मार्ग सोडून व्यावसायिक व नवोन्मेषी पद्धतीने काम करु लागते तेंव्हा ती आपोआपच सामाजिक उद्यम म्हणून ओळखली जाऊ लागते. क्राय, एडलगिव्ह फाऊंडेशन, अ‍ॅक्युमेन फंड ही विनालाभ सामाजिक उद्यमांची काही उदाहरणे म्हणता येतील.

लाभहेतु किंवा ज्याला फॉर-प्रॉफिट सामाजिक उद्यम म्हटले जाते अशा संस्था सहकार, वित्तीय संस्था किंवा कंपनी कायद्याखाली नोंदवितात. लाभहेतु म्हटले तरी केवळ नफा कमाविणे हाच त्यांचा एकमेव उद्देश्य नसतो. बरेचदा बॉटम ऑफ दी पिर्‍यामिड वर्गातील लोकांना परवडणार्‍या दरात उत्पादन किंवा सेवा उपलब्ध करुन देण्याचे काम असे लाभहेतु सामाजिक उद्यम करतात. परंतु असे उत्पादन सामाजिक समस्येवर उत्तर म्हणून हवे तरच त्यांस सामाजिक उद्यम म्हणता येईल. परवडणारा दर असला तरी दोन रुपयांत शॅम्पू सॅशे विकणार्‍या कंपनीस किंवा ५ रुपयांत तंबू थेटरात चित्रपट दाखविणार्‍यांस सामाजिक उद्यम म्हणता येणार नाही. लाभहेतु सामाजिक उद्यमांचे उदाहरण द्यायचे झाल्यास ग्रीनलाईट प्लॅनेट, सेल्कोडी.लाईट यांचे देता येईल. या तीनही कंपन्या ग्रामीण गरिबांना परवडेल अशा किंमतीत सौर दिवे उपलब्ध करुन देतात. यातून मुख्यतः तीन सामाजिक उद्देश्य साध्य होतात. १. रॉकेल बत्तीच्या धुरापासून मुक्तता २. वीज खर्च व टंचाईतून अंशतः मुक्तता. आणि ३. विद्यार्थी अंधार पडल्यानंतरही अभ्यास करु शकतात.

गरीबांना परवडणार्‍या दरातील आधुनिक रुग्णसेवा देणारी वात्सल्य हेल्थकेअर, नारायण हृदयालयअरविंद आय हॉस्पिटल ही सुद्धा लाभहेतु सामाजिक उद्यमांचीच उदाहरणे आहेत. एटीएम बनविणारी व्होर्टेक्स इंजिनीयरिंग थेट गरीबांना कोणतेही उत्पादन विकत नाही तरीही ही कंपनी लाभहेतु सामाजिक उद्यम प्रकारात गणली जाते. व्होर्टेक्सने बॅंकांना ग्रामीण भागासाठी अनुरुप अशी कमी किंमतीची (Low Cost) एटीएम बनविली आहेत. या एटीएम यंत्रांना वातानुकूलित यंत्राची गरज भासत नाही. तसेच वीजही कमी लागते. यामूळे बॅंकांना वित्तीय समावेशकतेचे (Financial Inclusion) उद्दिष्ट साध्य करण्यास मदत होणार आहे

सहकारी क्षेत्रातील बॅंका, पतपेढ्या, ग्राहक बाजार, खरेदी-विक्री संघ व अन्य संस्था यांची गणना सुद्धा लाभहेतु सामाजिक उद्यमांतच करायला हवी परंतु सद्यस्थिती पाहता यातील बर्‍याच संस्था आपल्या उद्दीष्टांनुसार काम करतात का हा विचारण्याजोगा प्रश्न आहे. अलिकडच्या काळात उदयास आलेल्या सुक्ष्म वित्त (Micro Finance) कंपन्या या सुद्धा सामाजिक उद्यमांचाच एक प्रकार आहे. पंरंतु यांचेही चित्र सध्या काही ठिक नाही.

असो, लाभहेतु सामाजिक उद्यम हा रोचक परंतु न संपणारा विषय आहे. आता इथेच थांबूया. पुढील भागात मिश्र सामाजिक उद्यमांबद्दल चर्चा करू. (क्रमशः)

0 प्रतिक्रिया:

Post a Comment