सामाजिक कार्याची नवी वाट - भाग २

१९९८ साली जगप्रसिद्ध व्यवस्थापन गुरु प्रा.सी.के. प्रल्हाद यांनी त्यांच्या ’दी फॉर्च्युन अ‍ॅट दी बॉटम ऑफ दी पिरॅमिड’ या पुस्तकात क्रांतीकारी विचार मांडला. ते म्हणतात "उद्योग, सरकार व देणगीदार संस्थांनी गरिबांना दीन न समजता सृजनशील उद्योजक व ग्राहक म्हणून त्यांचा विचार करावा. या वर्गाच्या गरजानुरुप सेवा देणार्‍या कंपन्यांना प्रचंड लाभ होऊ शकतो कारण आजचे गरीब हे उद्याचे मध्यमवर्गीय आहेत. सामाजिक आर्थिक रचनेत सर्वात खालच्या स्तरामध्ये असणार्‍या या वर्गाचे वैयक्तिक उत्पन्न जरी नगण्य असले तरी सामुहिक क्रय शक्ती प्रचंड आहे." एक वा दोन रुपयांत सॅशेतून मिळणारे तेल, शॅम्पु व खाद्यपदार्थ बहुदा वरील विचाराचेच फलित आहे.

प्रा. प्रल्हाद यांच्या या विचारावर जरी काही आक्षेप नोंदविले गेले तरी या निमित्ताने त्यांनी मांडलेल्या बॉटम ऑफ दी पिर्‍यामिड वर्गाची ताकद लोकांच्या लक्षात आली. मळलेल्या पायवाटांनी न जाता अभिनव पद्धतीने या वर्गाचे प्रश्न सोडवून त्यांचे जीवनमान सुधारता येऊ शकते याची सामाजिक विचारवंतांना खात्री पटली. "एखाद्या व्यक्तिस तुम्ही जर मासे खाऊ घातलात तर तुम्ही त्याचे त्यादिवशी पोट भराल. परंतु त्यास जर मासे कसे पकडावे हे शिकविलात तर तुम्ही त्या व्यक्तिचे आयुष्यभरासाठी पोट भराल" अशा अर्थाची चीनी म्हण आहे. गरिबांचे जीवनमान सुधारायचे असल्यास केवळ मोफत वा सवलत देऊन भागणार नाही तर त्यांना त्यांच्या पायावर उभे करुन आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आवश्यक आहे हेच सामाजिक उद्यमशीलतेमागील मुख्य तत्त्व आहे.

आज जागतिक स्तरावर सामाजिक उद्यमशीलता म्हटले की सर्वात प्रथम डॉ. महंमद युनूस यांच्य ग्रामीण बॅंकेचे उदाहरण डोळ्यासमोर येते. बांग्लादेशातील गरिबांना कोणत्याही तारणाशिवाय सुक्ष्म कर्जांचे वाटप करुन त्यांचे जीवनमान उंचावण्याचा अनोखा प्रयोग डॉ. युनूस यांनी केला. त्याबद्दल २००६ साली त्यांचा नोबेल पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. आज सेवाक्षेत्रात जगभर सामाजिक उद्यमशीलता हा परवलीचा शब्द झाला असला तरी भारतात ही काही अगदीच नवीन संकल्पना नाही. १९४६ साली गुजरातेतील आणंद या छोट्याश्या गावात स्थापन झालेली ’अमुल’ व मुंबईच्या गिरगावातील एका चाळीत १९५९ साली सामान्य घरातील सात महिलांनी सुरु केलेली ’लिज्जत’ या दोन संस्था सामाजिक उद्यमांची भारतातील आद्य व यशस्वी उदाहरणं आहेत. (क्रमशः)

0 प्रतिक्रिया:

Post a Comment