सामाजिक कार्याची नवी वाट - भाग १

सेवायोगचा मुख्य उद्देश्य जरी ग्रामीण व निमशहरी भागातील स्वयंसेवी संस्थांना विविध संधींची माहिती करुन देणे हा असला तरी या संस्थांमध्ये काम करणार्‍या कार्यकर्त्यांना आपल्या परिघाबाहेरच्या जगात चाललेल्या नवीन वैचारिक प्रवाहांची व घडामोडींची माहिती करुन देउन त्यांना अद्यावत राहण्यास मदत करण्याच्या उद्देशाने वरचेवर विविध विषयांशी संबंधित लेख प्रकाशित करण्याचा मानस आहे.

सामाजिक उद्यमशीलतेची (Social Entrepreneurship) तोंड ओळख करुन देणारा लेख सेवायोगवर या आधी प्रकाशित झाला आहे. सेवाक्षेत्रातील बदलता कल लक्षात घेता या विषयावर विस्ताराने लिहिणे क्रमप्राप्तच होते. काही भागांमध्ये हा विषय आपल्या समोर मांडत आहे.


इनव्हेस्टमेंट बॅंकिंग मधील उमेदीचे करिअर सोडून ध्रुव लक्रा या तरुणाने कर्ण-बधीर व्यक्तिंना सोबत घेऊन ’मिरॅकल कुरियर’ ही कंपनी सुरु केली. ह्युस्टन विद्यापीठातून एमएस केलेल्या डॉ. अश्विन नाईकने परदेशातील मोठ्या उत्त्पन्नाच्या संधी सोडून ग्रामीण भागात परवडणार्‍या दरात उत्तम सेवा देणारी वात्सल्य रुग्णालये सुरु करण्याचा ध्यास बाळगला. या दोन्ही उदाहरणांमध्ये समान बाब आहे ती म्हणजे दोघांनीही स्वयंसेवी संस्था सुरु न करता सामाजिक उद्यमशीलतेच्या माध्यमातून परिवर्तन आणण्याचा प्रयत्न केला आहे. काही वर्षांपुर्वी सामाजिक कामाकडे एखादी एनजीओ (NGO) सुरु करुन वंचितांसाठी प्रकल्प राबविणे इतक्याच मर्यादित अर्थाने पाहिले जाई. परंतु अलिकडच्या काळात सामाजिक कामाकडे पाहण्याचा दृष्टिकोण व ते करण्याच्या प्रकारातही बदल झालेला दिसून येतो.

देणग्यांवर उभ्या राहणार्‍या स्वयंसेवी संस्थेच्या व तिच्या सामाजिक कामाच्या काही अंगभूत मर्यादा असतात. स्वयंप्रेरणेने व प्रामाणिकपणे सेवाकार्य करणार्‍या व्यक्तिंच्या जीवावरच अशी कार्ये टिकून असतात. परंतु आज समाजात अशा व्यक्तिंचीच वानवा दिसून येते. त्यामूळेच जागोजागी नकली स्वयंसेवी संस्थांचा सुळसुळाट झालेला दिसतो. परिणामी आज सामाजिक कामासाठी देणग्या देताना देणगीदार दहादा विचार करतात.

एखाद्या उद्योगाप्रमाणे अगदी व्यावसायिक पद्धतीने परंतु धंदेवाईक दृष्टिकोण टाळून सामाजिक उद्यम चालविला जातो. यात नवोन्मेषी परंतु वास्तवदर्शी दृष्टिकोण अंगिकारला जातो तसेच उपक्रमाच्या शाश्वततेवर भर दिला जातो. सामाजिक उद्यमामध्ये उपक्रमाची यशस्विता सामाजिक परिमाणाबरोबरच केलेल्या गुंतवणुकीवरील परतावा या मापदंडांवर मोजली जाते. सामाजिक उद्यमात विना-लाभ (Non-Profit), लाभदायी (For-Profit) किंवा या दोघांचीही वैशिष्ट्ये असलेला मिश्र उपक्रम (Hybrid) असू शकतो.

पुढील भागांत आपण सामाजिक उद्यमांच्या या तीनही प्रकारांची विस्ताराने माहिती घेऊ (क्रमशः)

0 प्रतिक्रिया:

Post a Comment