दोन अनोख्या फेलोशिप

आजच्या दोन फेलोशिपची माहिती केवळ त्याकरिता अर्ज करणार्‍या व्यक्तिंसाठीच नसून पारंपरिक पद्धतीने सामाजिक काम करणार्‍या कोणत्याही लहान मोठ्या सामाजिक संस्थेला त्यातून प्रेरणा मिळावी यासाठी देत आहे. आपणही आपल्या संस्थेमध्ये क्षमतेनुसार अशा फेलोशिपच्या संधी निर्माण करुन नवीन व्यक्ती व विशेषत: तरुणांना आपल्या कामात आकर्षित करु शकता. इच्छुकांना संबंधित संस्थांच्या संकेतस्थळावर जाऊन अधिक माहिती मिळविता येईल.
अनलिमिटेड इंडिया या सामाजिक उद्यमशीलतेला प्रोत्साहन देणार्‍या संस्थेतर्फे अनोख्या कल्पना घेऊन सामाजिक काम करणार्‍या किंवा तसे करण्याची इच्छा असणार्‍या व्यक्तिंसाठी दरवर्षी फेलोशिप दिली जाते. यावर्षी ३० एप्रिल २०११ पर्यंत इच्छुकांना अर्ज करता येतील. परंतु नियमित व्यक्तिगत संपर्काच्या कारणास्तव ह्या फेलोशिप करिता केवळ मुंबई व आसपासच्या परिसरातील व्यक्तिंचाच विचार केला जातो.

या फेलोशिपचे वैशिष्ट्य म्हणजे रुढ वाटेशिवाय अनोख्या पद्धतीने सामाजिक काम करु पाहणार्‍या १६ वर्षांवरील कोणत्याही व्यक्तिस याकरीता अर्ज करता येतो. कोणत्याही सामाजिक समस्येवर मात करण्यासाठी तुमच्याकडे एखादी नवोन्मेषी कल्पना असेल किंवा तुम्ही प्रत्यक्ष ती कल्पना राबवित असाल तर तुम्ही या फेलोशिपसाठी अर्ज करु शकता. निवडलेल्या उमेदवारांस प्रकल्पाच्या आवश्यकतेनुसार आर्थिक सहाय्य केले जाते. तसेच वर्षभर विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्तिंद्वारे मार्गदर्शन केले जाते. अधिक माहितीसाठी अनलिमिटेड इंडियाच्या संकेतस्थळास भेट द्या.

अशीच एक दुसरी फेलोशिपची संधी आहे ती हुबळीच्या देशपांडे फाउंडेशनची. सिलिकॉन व्हॅलीतील प्रख्यात उद्योजक गुरुराज देशपांडे यांनी सामाजिक कार्यासाठी देशपांडे फाऊंडेशनची स्थापना केली. सन २००८ पासून या फाउंडेशनतर्फे सदर फेलोशिप सुरु करण्यात आली. सामाजिक क्षेत्रात ज्यांना करिअर करावयाचे आहे अशा तरुणांसाठी ही फेलोशिप एक उत्तम संधी आहे. निवडलेल्या उमेदवारांना सहा महिने हुबळी-धारवाड परिसरात राहून काम करावे लागते. तीन मुख्य प्रकारांतर्गत एकूण ३६ विषयांवर या कालावधीत तज्ञांमार्फत प्रशिक्षण दिले जाते. उमेदवारांमध्ये सृजनशीलता व उद्यमशीलता वाढीस लागावी याकरिता विशेष लक्ष दिले जाते. अधिक माहितीसाठी या संकेतस्थळास भेट द्या.

0 प्रतिक्रिया:

Post a Comment