स्वयंसेवी संस्थांमधील व्यवसायनिष्ठ दृष्टिकोन

मागील काही वर्षांत मोठ्या स्वयंसेवी संस्थांचे कंपनीकरण झालेले दिसते. व्यवसायिक दृष्टिकोन ठेऊन काम करणार्‍या कंपन्यांप्रमाणेच स्वयंसेवी संस्थांमध्येही अशा प्रकारच्या कामाची पद्धत रुढ होऊ पाहते आहे. संस्थांमधील पुर्वीचे प्रमुख कार्यवाह आता मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) झालेले दिसतात. हा बदल केवळ पदनामातच झाला नसून तो जबाबदारीमध्येही परिवर्तित झालेला दिसतो. प्रकल्पांचे आराखडे, आर्थिक तरतूदी, संघटनात्मक रचना, कार्यक्रमांचे आयोजन, जनसंपर्क व प्रसिद्धी, इत्यादी बाबींमध्ये स्वयंसेवी संस्थांच्या कामात व्यवसायनिष्ठ दृष्टिकोन (Professional Approach) तयार झालेला दिसून येतो. हा व्यवसायनिष्ठ दृष्टिकोन म्हणजे नेमके काय आहे, त्याची कामातील आवश्यकता व तो अवलंबिण्यासाठीच काय करणे आवश्यक आहे या विषयावर श्री. रत्नाकर पाटील यांचे काही लेख सेवायोगवर प्रकाशित केले जातील. त्यातील हा पहिला लेख...

 अलिकडच्या काळात सामाजिक कामाकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदललेला दिसतो. याला मुख्यत: बदललेल्या सामाजिक, आर्थिक परिस्थिती सोबतच लोकांमधील वाढती जागरुकताही जबाबदार आहे. मागील काही वर्षांत सरकारसोबतच स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून देशभरात विकासाची कामे सुरू झाली आहेत. केवळ सामाजिक कामाची हौस भागविण्यासाठी वा एखाद्या प्रश्नांवर उत्तर मिळविण्यासाठी म्हणून सुरु झालेल्या कामाला आता उदरनिर्वाहाचे साधन, समाजात प्रभावी होण्यासाठीचे एक माध्यम म्हणून प्रतिष्ठा मिळू लागली आहे.  करियरचा एक वेगळा आणि प्रभावी पर्याय म्हणून देखील स्वयंसेवी कामाकडे बघितले जाते.  एम.एस.डब्ल्यु., एनजीओ व्यवस्थापन सारख्या अभ्यासक्रमांनी या प्रकारच्या कामाला व्यवसायभिमूख बनविले आहे. त्यामुळेच व्यावसायिक पद्धतीने संस्था चालविताना त्यातील सामाजिकतेचा, माणसांचा, आजूबाजूच्या परिस्थितीचा विचार करणे गरजेचे झाले आहे.

बहुतांशी सार्वजनिक संस्था-संघटनांमधे काम करण्याची पद्धत ही प्रामुख्याने "सब चलेंगे, साथ चलेंगे" अशी आहे. त्यामुळे मिळालेले यश किंवा अपयश हे सगळ्यांचेच असते. या पद्धतीत क्षमतावान कार्यकर्त्याबरोबरच कमी जबाबदारी घेणारे, संस्था-संघटनेशी एकनिष्ठ हा एकमेव गुण घेऊन काम करणारे आणि सर्वांबरोबर आम्हीही अशा मन:स्थितीत काम करणारे असे सर्वजण मिळालेल्या यशाचे धनी होतात. वरिल संदर्भातील क्षमतावान कार्यकर्त्यांच्या योगदानाचा विचार केल्यास अनेक वेळा यशाचे माप त्यांच्या पदरात पडण्यात अन्याय होतो. तर दुसर्‍या बाजूला अन्य सर्व प्रकारच्या कार्यकर्त्यांना "साथ चलेंगे" च्या सवयीमुळे त्यांच्यातील उणीवांची जाणीवच होत नाही. (बर्‍याच संस्थांमधे अशी जाणीव वेळेत व योग्य शब्दात करुन देण्याची व्यवस्थाच मुळी नसते). त्यामुळे साचेबद्ध विचार व आचार या पठडीतच असे कार्यकर्ते - कर्मचारी कायम वागत असतात. या कार्यकर्त्या - कर्मचार्‍यांच्या दृष्टिकोनात जर गुणात्मक फरक पडला तर ते करत असलेले काम हे अधिक वेगाने व गुणवत्तेने पुढे जाऊ शकेल व संस्थाही नावारुपास येऊ शकेल.

हे सर्व होण्यासाठी संस्थात्मक स्तरावर संवादाची जशी रचना असणे आवश्यक आहे तशीच संस्थेच्या रोजच्या कामाच्या पद्धतीत देखील आधुनिक व्यवस्थापकीय पद्धतीचा उपयोग करणे गरजेचे झाले आहे. व्यवसायिक दृष्टिकोन ठेऊन काम करणार्‍या विविध आस्थापनांमध्ये या प्रकारच्या सर्वच "आयुधांचा" वापर मुक्तपणे केला जातो, परंतु संस्था व संघटनात्मक जीवनात या प्रक्रियेकडे "आयुधं" म्हणून न बघता कार्यकर्त्यांच्या विकासासाठी व पर्यायाने संस्थेच्या उन्नतीसाठी उपलब्ध असलेली माध्यमे म्हणून बघता येईल. त्यामुळे आपले काम आधुनिक भाषेत ज्याला व्यवसायनिष्ठ दृष्टिकोन (professional approach) म्हणतात त्या दिशेने घेऊन जाता येइल.

(श्री. रत्नाकर पाटील जळगाव येथील केशव स्मृती प्रतिष्ठानचे सचिव म्हणून काम पाहतात. विद्यार्थी चळवळीतील पुर्णवेळ कामासोबतच पर्यावरण दक्षता मंच, ठाणे व रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी या संस्थांमधील कामाचाही त्यांना अनुभव आहे.)

0 प्रतिक्रिया:

Post a Comment