स्वयंसेवी संस्थांमधील व्यवसायनिष्ठ दृष्टीकोन: संस्था जीवन (भाग ४)


संस्था चालविताना अनेक वेळा कायद्याने घालून दिलेल्या चौकटीमुळे काही प्रशासकीय बाबी, आर्थिक नियोजनाचे विषय पूर्ण करुनही संस्थाजीवन चांगले चालल्याचे दिसत नाही. सर्व प्रकारची तांत्रिकता पूर्ण झाल्यावरही संस्थेच्या इप्सितांपैकी अनेक उद्दिष्टं अपूर्ण राहिलेली दिसतात. याचा थोडा खोलात जाउन विचार केल्यास असे लक्षात येते की, कागदपत्रांची पूर्तता ही शासकीय यत्रंणेने केलेल्या नियमांचे पालन करण्यासाठी उपयोगी आहे. परंतु संस्था यशस्वीरित्या चालवण्यासाठी आवश्यक आहे ते म्हणजे संस्थेच्या उद्दिष्टांविषयी,  तिच्या कामाच्या पद्धतींविषयी व ज्या कार्यकर्त्यांच्या बळावर काम उभे राहणार आहे, त्यांच्या कामाविषयीच्या समजुती वाढवण्यासाठी करावयाचे प्रयत्न.

संस्थेच्या व्यवसायनिष्ठतेकडील प्रवासाच्या या टप्प्याची जबाबदारी ही मुख्यत: संस्थेचे संचालन करणार्‍या संस्थाचालकांची तसेच वरिष्ठ अधिकार्‍यांची आहे. त्यांनी याकरीता सामूहिक प्रयत्न करण्याची गरज वाटते.

संस्थांत्मक पातळीवर करावयाच्या बाबी-

 1. संस्थेच्या ध्येय उद्दिष्टांविषयी व ती साध्य करण्यासाठी करावयाच्या कार्यक्रमाविषयी लिखित दस्तावेजीकरण.
 2. अल्पकालीन व दीर्घकालीन उद्दिष्टे साध्य करण्याचे मार्ग वा माध्यम याविषयी लिखित मसूदा असणे.
 3. प्रत्येक कामाची उद्दिष्टे, त्यांचा कालावधी व अपेक्षित निकाल या विषयी लिखित नोंदी ठेवणे.
 4. आपल्याला (संस्था/व्यक्ती म्हणून) जे काम करायचे आहे त्याविषयी, त्याच्या अंतिम स्वरूपाविषयी सर्व कार्यकर्ते - कर्मचार्‍यांना स्पष्टता आणण्यासाठी प्रयत्न करणे.
 5. कार्यकर्ता-कर्मचारी यांच्या अपेक्षित कामासंबधी लिखित माहिती असणे जेणेकरुन त्यांना त्यांच्या कामाबद्दल स्पष्टता येण्यास मदत होईल.
 6. कर्मच्यार्‍यांना देण्यात येणार्‍या सुविधांविषयातील लिखित दस्तावेजीकरण असणे. (रजा, पगार, सुट्टी, कामाचे तास, प्रवास सुविधा, इत्यादी.)
 7. संस्थेच्या कामाच्या पद्धती संदर्भातील नियमावली व आचारसंहिता (cod of conduct)  तयार करणे व त्यानूसार संस्थेचा व्यवहार चालविणे.
 8. गुणवत्तेला, चांगल्या कामाला संस्थात्मक स्तरावर प्रोत्साहन व तात्काळ सकारात्मक प्रतिसाद देणे. त्यासाठी तसे धोरण तयार करणे.
 9. निर्णय घेताना भावनेबरोबरच वस्तुस्थिती, आकडेवारी व तर्काला स्थान देणे.
 10. संस्थेच्या कामात अधिकाधिक पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्न करणे..
 11. संस्थेचे नियम हे व्यवस्था नीट लागण्यासाठी असून व्यक्तिंना (कर्मचार्‍यांना) शिक्षा देण्यासाठी नाहीत हा दृष्टिकोन ठेवणे. नियम इतकेही तकलादू असू नयेत की ज्याचा लोक गैरफायदा घेतील तसेच ते इतकेही कडक असू नयेत की ज्याने संस्थेची शाळा होईल.
 12. आपण घेत असलेले परिश्रम (पैसा, वेळ, माणसांची गुंतवणूक, इ.) व मिळत असलेला प्रतिसाद याबाबत जागरुक असणे. जसे व्यावसायिक कंपन्या मोठा प्रकल्प हाती घेण्याआधी त्याचा सुसाध्यता अभ्यास (feasibility study) करतात, त्याचप्रमाणे संस्थांनीही कोणताही कार्यक्रम वा प्रकल्प सुरु करण्याआधी असा अभ्यास करुन त्याच्या यशस्वीतेचे व मुल्यमापनाचे निकष ठरवून ठेवले पाहिजेत.

वरील बाबी राबविल्यास संस्था चालविणार्‍या वा संस्थेत काम करणार्‍या काही व्यक्ती कालांतराने बदलल्या तरीही नविन व्यक्तिंना संस्थेचे धोरण, तिची कार्यपद्धती समजून घेण्यात अडचण येत नाही. आजच्या व्यवसायनिष्ठ (professional) जगात संस्थेच्या कामाची पारदर्शकता दिसण्यासाठी व त्यातून मिळणार्‍या आर्थिक मदतीसाठीही उपरोक्त बाबींचा उपयोग होऊ शकतो.

(या लेखमालिकेतील आधीचे लेख: भाग १,  भाग २भाग 3)

0 प्रतिक्रिया:

Post a Comment