स्वयंसेवी संस्थांमधील व्यवसायनिष्ठ दृष्टीकोन: व्यक्ति व्यवहार (भाग ५)

मागील भागात आपण संस्थात्मक पातळीवर व्यवसायनिष्ठता आणण्यासाठी सामुहिकरित्या करावयाच्या प्रयत्नांविषयी बघितले. हे प्रयत्न अधिक परिणामकारक करावयाचे असल्यास संस्था चालविण्याच्या मन:स्थितीत असलेल्या कार्यकर्ता व कर्मचार्‍याने व्यक्तिगत स्तरावर काही प्रयत्न करणे गरजेचे आहे. Think Globally, Act locally, Respond individually.या सुप्रसिद्ध वचनाप्रमाणे संस्थात्मक व्यवसायनिष्ठतेच्या विषयी ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी संस्थेच्या कामातील व्यक्तिगत साधनसूचिते विषयी सजग राहणे आवश्यक असते.

त्यामुळे संस्थास्तरावर आपण मांडत असलेल्या योजना, आग्रहाचे विषय, नियमांचे पालन इ.बाबींकडे संस्थेतील सर्वचजण गांभीर्याने बघतील. व्यक्तिगत स्तरावर करण्याच्या या बाबींचा संस्थात्मक कामात तर उपयोग होईलच पण त्याबरोबरच व्यक्तिगत पातळीवरही अनेक चांगल्या सवयी आत्मसात होऊन तुमचे व्यक्तिमत्व प्रभावी बनेल. यासाठी खालील गोष्टी अंगी बाणविणे गरजेचे आहे. वरवर जरी या बाबी लहान-सहान वाटत असल्या तरी त्या महत्त्वाच्या आहेत हे लक्षात ठेवा.

व्यक्तिगत स्तरावर करावयाच्या बाबी:

 1. आपल्या कामाचे दैनंदिन, साप्ताहिक व मासिक असे लिखित नियोजन करुन ठेवणे.
 2. दिलेले काम वेळेत व परिपूर्ण करणे.
 3. वेळ पाळणे, उशिर होणार असल्यास आगाऊ सूचना देणे, व झाल्यास त्याबद्दल संबंधित व्यक्तिकडे दिलगिरी व्यक्त करणे.
 4. स्वत:च्या पोशाखाविषयी निटनेटकेपणा ठेवणे. (दाढी, केस, नखे, स्वच्छ कपडे, शक्य व सोयीचे असल्यास बूट घालणे)
 5. पॉकेट डायरी व पेन बाळगणे, दैनंदिन वापरासाठी पूर्ण पान असलेली डायरी वापरणे.
 6. दिलेल्या कामासंदर्भातील सद्यस्थिती योग्य व्यक्तिला नेमक्या शब्दात योग्य वेळी कळविणे.
 7. आपण करत असलेल्या कामाविषयी इतरांना कल्पना देणे.
 8. जबाबदारी घेण्याची तयारी ठेवणे.
 9. आपल्या विषयात तज्ञ असणे. त्याकरिता संबंधित विषयात सखोल वाचन करणे.
 10. संस्थेने केलेल्या नियम व संकेतांचा भाव जाणून काम करणे. 
 11. आपल्याला दिलेल्या कामाबद्दल व संस्थेबद्दल अभिमान असणे.
 12. पूर्वग्रह न ठेवता घटना व व्यक्तिकडे पाहणे.
 13. निर्णय घेताना भावनेबरोबर वस्तुस्थिती, आकडेवारी व तर्कावर आधारित निर्णय घेणे.
 14. लक्ष्य निश्चित करून काम करणे. त्यासाठी परिपुर्ण आराखडा बनविणे.
 15. दिलेल्या कामाच्या परिघात काम करणे. इतरांच्या कामात त्यांच्या मान्यतेनेच लक्ष घालणे.
 16. गुणवत्तेला, चांगल्या कामाला प्रोत्साहन व तात्काळ सकारात्मक प्रतिसाद देणे. 

वरिल बाबी या साध्या सोप्या जरी वाटल्या तरी त्या नियमित करण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतात. व्यक्तिगत स्तरावर करावयाच्या या सर्व बाबींचे वैशिष्ट्य म्हणजे आपण कोठेही काम करत असलो  तरी त्या सर्व ठिकाणी यांचा उपयोग होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी आपले व्यक्तिमत्व अधिक उठावदार, प्रभावी व आपले काम अधिक परिणामकारक होण्यासाठी याचा निश्चितच लाभ होऊ शकतो.

(या लेखमालिकेतील आधीचे लेख: भाग १,  भाग २भाग 3 भाग ४)

0 प्रतिक्रिया:

Post a Comment