स्वयंसेवी संस्थांमधील व्यवसायनिष्ठ दृष्टिकोन: समारोप


आजचा हा लेख या मालिकेचा समारोपाचा लेख आहे. खरतर व्यवसायनिष्ठता ही काही वाचनाचा वा भाषणाचा विषय नाही. ती अंगी बाणवावी लागते. त्यासाठी ठरवून प्रयत्न करावे लागतात. केवळ आर्थिक व्यवहार प्रमाणिक असला म्हणजे सर्वकाही आलबेल आहे असा बरेचदा लोकांचा गैरसमज असतो. परंतु व्यवसायनिष्ठता आणण्यासाठी केवळ इतके पुरेसे नाही. स्वयंसेवी संस्थाच्या व्यवसायनिष्ठते विषयात विचार करतांना आपण या लेखमालिकेत १) प्रशासकीय बाबींची पूर्तता २) आर्थिक नियोजन ३) संस्थांत्मक व ४) व्यक्तिगत पातळीवरील व्यवहार या मुद्यांचा विचार केला. या सर्व बाबी एकाच वेळी संस्थेमध्ये लागू होतील असे नाही, पण अशा प्रकारच्या रचना करण्याचा प्रयत्न केल्यास कालांतराने या सर्व बाबी अमलात येऊ शकतील.

सध्या शासनपद्धतीत, खाजगी कंपन्यांच्या कारभारात व अगदी स्वयंसेवी क्षेत्रातही "गुड गव्हर्नन्स" म्हणजेच "सु-प्रशासन" या शब्दाचा बोलबाला आहे. कोणत्याही संस्थेतील व्यवसायनिष्ठतेचा प्रवास हा त्या संस्थेस "गुड गव्हर्नन्स" कडे नेणारा असतो. आता जाता-जाता या "सु-प्रशासन" संकल्पनेची वैशिष्ट्ये जाणून घेऊन या लेख मालिकेचा समारोप करुया.

  • कामाचा लक्ष्य केंद्रित प्रयत्न: संस्थेला ज्या परिसरात, विषयात काम करायचे आहे त्याची रचना, आवश्यकता, उपयोगिता या विषयी संस्था चालवणार्‍यांमध्ये एकमत असणे व अनुरुप प्रयत्न करणे गरजेचे आहे. असे होत नसल्यास,सरकारी वा खाजगी संस्थेच्या अनुदानामूळे सूरु झालेला उपक्रम हा त्या अनुदानाबरोबरच संपतो. 
  • लोकसहभाग (Participatory): कोणत्याही संस्थेच्या वाटचालीसाठी, विकासासाठी संस्थेच्या ध्येय धोरण, कार्यक्रम, व  उपक्रम राबविण्यात लोकसहभाग जेवढा जास्त असतो तेवढा संस्थेतील कामकाजात जिवंतपणा जास्त राहतो. लोकसहभागाच्या कल्पनेत केवळ संस्थेबाहेरील व्यक्ति नसून संस्थार्तगत काम करणार्‍या कर्मचारी-कार्यकर्त्याची (पुरुष-महिला) सक्रीय भूमिका देखील अपेक्षित आहे. निर्णय प्रक्रियेतील सर्वांचा सहभाग हा सगळ्यांचा उत्साह वाढवणारा असतोच पण त्याही पेक्षा तो कामाची गुणवत्ता वढवणारा असतो. अशा प्रकारच्या लोकसहभागातून झालेली कामे ही दीर्घकाळ टिकणारी असतात. संस्थेचे काम हे कालसुसंगत व अधिक समाजाभिमुख होण्यासाठी, आपण करत असलेल्या कामाचे विश्वस्तांनी समाजातील प्रतिष्ठितांच्या माध्यमातून ठराविक कालावधीने परीक्षण करुन त्यातील सूचनांची अंमलबजावणी करावी.
  • उत्तरदायित्वाची भावना (Accountable): स्वयंसेवी कामाच्या स्वरुपातच समाजातील कोणत्यातरी एका प्रश्नांवर, समस्येवर(आर्थिक,सामजिक,शैक्षणिक,वैद्यकीय इ.) उत्तर काढण्याचा प्रयत्न असतो.  ज्या (लाभार्थी) व्यक्तिंसाठी व कामासाठी संस्थेची स्थापना झाली आहे, त्याच्या हितसंबधांना बाधा न येणारे किंबहुना त्यांच्या आवश्यकता पूर्ण करणारी कृती वा निर्णय घेणे महत्वाचे असते.  या लाभार्थीं सोबतच संस्थेशी निगडित सर्व घटकांच्याप्रती उत्तरदायित्वाची भावना असणे गरजेचे आहे.
  • पारदर्शकता (Transparent): पारदर्शकतेचा एक अर्थ असाही असतो की संस्थेत जे काही निर्णय होतील ते संस्थेने केलेल्या नियमांना धरुन असतील. संस्थेच्या संबधातील सर्व प्रकारची माहिती, संस्थेच्या सर्व प्रकारच्या संबधित (stakeholders) व्यक्ती व संस्थांना बघण्यास उपलब्ध असावेत. संस्थेचे नियम, निर्णय, अहवाल हे सर्वांना समजतील अशा साध्या सोप्या भाषेत असावेत.
  • सर्वसहमतीने निर्णय (Consensus oriented): संस्था चालवतांना संस्थेच्या हिताबद्द्ल सर्वच जण आग्रही असतात. मात्र सर्वांची मते ही एकसारखी असतीलच असे नाही. त्यामुळे निर्णयामध्ये एकजीनसीपणा येण्यात थोडा वेळ लागतो. तरी देखील धोरणात्मक निर्णयात सर्वांची मते घेण्यात यावीत. संस्थेच्या दीर्घकालीन विकासाचा विचार केल्यास संस्थेच्या ध्येय, उद्दिष्टांशी अनुरुप व सर्वांच्या मताचा आदर करणारे निर्णय घेणे हे अधिक योग्य असते. 
  • व्यक्तिगत उपयोगितता नको: स्वयंसेवी कामातून मिळणारा पैसा, प्रसिद्धी व अन्य लाभ संचालक मंडळातील सदस्यांनी स्वत:च्या उपयोगासाठी करु नये.  (उदा. वाहन, कर्मचार्‍यांची उपलब्धता इ.).  अशा प्रकारच्या सवयीमुळे संस्थेत काम करणार्‍या कार्यकर्ता-कर्मचार्‍यांचा संस्थाचालकांवरील व संस्थेच्या ध्येय धोरणांवरील विश्वास कमी होते. त्याचा नकारात्मक परिणाम त्यांच्या कामावर होत असतो.

वरिल सर्वच मुद्दे एका वेळेस संस्थेत लागू होणे कठीण आहे पण अशक्य नक्कीच नाही. टप्प्या टप्प्याने या बाबींचा वापर संस्थेच्या कामात सातत्याने करण्याचा प्रयत्न केल्यास संस्थेचे काम निश्चितच अधिक प्रभावी व परिणामकारकतेच्या दिशेने होऊ शकते.

(या लेखमालिकेतील आधीचे लेख: भाग १,  भाग २भाग 3भाग ४  भाग ५)
(सेवायोगसाठी सदर लेखमालिका श्री. रत्नाकर पाटील यांनी लिहिली आहे. ते जळगाव येथील केशव स्मृती प्रतिष्ठानचे सचिव म्हणून काम पाहतात. विद्यार्थी चळवळीतील पुर्णवेळ कामासोबतच पर्यावरण दक्षता मंच, ठाणे व रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी या संस्थांमधील कामाचाही त्यांना अनुभव आहे.)

0 प्रतिक्रिया:

Post a Comment