प्रस्तावना

बघता बघता इंटरनेटने अवघं विश्व एका क्लिक वर आणून ठेवलं आहे. वेळेअभावी जिथे माणसं एकमेकांच्या भेटीला पारखी होत होती, तिथे आज सोशल नेटवर्किंग साईट्सच्या माध्यमातून ती पुन्हा जोडली जाऊ लागली आहेत. जगभरातील समविचारी माणसं एकत्र येऊन विचारांचे, ज्ञानाचे व माहितीचे आदान प्रदान करीत आहेत. आज माहिती तसेच कृषी व जैव तंत्र ज्ञानाच्या क्षेत्रात नवे नवे शोध लागत आहेत. या शोधांचा, प्रयोगांचा लाभ सामाजिक उपक्रमांना वेळीच होण्याची नितांत गरज आहे. कारण आज जेंव्हा शासकीय योजनांवर हजारो कोटी खर्च होऊनही वंचितांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच आहे, तेंव्हा सामाजिक उपक्रम व उद्यमांच्या माध्यमातून हजारो सेवाव्रती समाजातील विषमता दूर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा सर्व प्रयत्नांची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवून त्यांच्या कामास गती व पाठबळ मिळावे हा सेवायोग सुरु करण्यामागचा उद्देश आहे.

सेवायोग वरिल 'सेवासंधी' विषयांतर्गत सेवाक्षेत्रातील नोकरीच्या, स्वयंसेवी संस्थांमधील सेवेच्या (व्हॉलंटीअरशीप) तसेच अभ्यासाच्या (इंटर्नशीप, रिसर्च, इ.) देशविदेशातील संधी आपल्यापर्यंत पोहचविण्यात येतील. कार्यक्रम शीर्षकांतर्गत स्वयंसेवी संस्थांचे व त्यांच्यासाठीच्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली जाईल.

या उपक्रमात आपला सक्रिय सहभाग अपेक्षित आहे. आपल्या संस्थेची व उपक्रमांची माहिती आमच्याकडे नियमित कळवा. आपण जर कुणा संस्थेशी संबंधित नसाल, परंतु सामाजिक उपक्रमांबाबत आपणांस आस्था, आवड असल्यास आंम्हास जरुर कळवा. तुमच्या अनुभवाचा व ज्ञानाचा सामाजिक कार्यात उपयोग होण्यास आम्ही मदत करु.

सामाजिक सुधारणांची व चळवळींची महाराष्ट्राला प्रदिर्घ परंपरा आहे. या परंपरेतल्या आजच्या पीढीने सेवायोगच्या माध्यमातून विविध विषयांतील समविचारी लोकांसोबत एकत्र येऊन माहितीचं, ज्ञानाचं व अनुभवाचं आदान प्रदान करावं व त्यायोगे सामाजिक कार्यकर्त्यांचं विशाल जाळ विणलं जावं अशी आमची अपेक्षा आहे.